मुंबई - मुंबई पोर्ट येथे गेल्या १४ एप्रिल १९४४ च्या झालेल्या स्फोटातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी अग्निशमनदल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात अग्नी सुरक्षा प्रात्यक्षिक घेण्यात आली. त्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मुंबईत काही दिवसांपासून आगीच्या घटनांध्ये वाढ झालेली आहे. आग लागल्यानांतर आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले तर मोठी हानी टळू शकते. यासाठी प्रत्येकाने प्रशिक्षित होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मुंबई अग्निशमन सप्ताहाच्या निमिताने अनेक ठिकाणी जनजागृती आणि प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अग्निशमन यंत्राद्वारे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्यासोबत रुग्णांनीही सहभाग घेतला होता.
कुठली आगीची मोठी घटना घडल्यास शिडीवरून रुग्णालयातून कसे बाहेर पडायचे? याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. अनेक ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्र असतात. मात्र, त्याचा वापर कसा करायचा? याबद्दल अनेकांना माहिती नसते. त्याचेही प्रात्यक्षिक यावेळी दाखवले.
एम. आय. डी. सी. अंधेरी येथे झालेल्या रुग्णालयाच्या आगीत लहान बालकांसह ८ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. राजावाडी रुग्णालयाची इमारत जुनी असल्याने अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा नाही. मात्र, आहे त्या यंत्रणेत आग कशी विजवावी याचे प्रात्यक्षिक दिले. रुग्णालयातील अवैध पार्किंगमुळे अग्निशमन यंत्रणेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. त्यावर उपाय करण्याची विनंती अग्निशमन दलाने केली आहे.
प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाशी किंवा १८०० २२२ १०१ या क्रमकांवर संपर्क साधण्याचे आवाहन अग्निशमन अधिकारी एस. बी. खरबजे यांनी केले.