मुंबई - कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर देशाबाहेरून आलेल्या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन केले जात आहे. मुंबईतील नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे. मात्र, नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी बॉलिवूड कलाकार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - कौशल्य विकास विभागात महिलांसाठी 30 टक्के राखीव कार्यक्रम
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना विरोधात लढाईत विजय मिळत असतानाच ब्रिटन येथे नवा कोरोना स्ट्रेन आढळून आला. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटन आणि युके येथून येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जात आहे. तर, इतर देशातून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. मुंबईकरांना या प्रवाशांच्या माध्यमातून नव्या कोरोनाची लागण होऊ नये अशी त्या मागची भूमिका आहे.
परस्पर घरी गेल्याचे उघडकीस
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची भीती असताना बड्या बॉलिवूड कलाकारांकडून मोठा हलगर्जीपणा होताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान हे २५ डिसेंबरला यूएईतून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यांना नियमाप्रमाणे क्वारंटाईन करता यावे म्हणून पंचतारांकित ताज लॅन्ड्स हॉटेलमध्ये २४ आणि २५ डिसेंबरचे बुकिंग करण्यात आले होते. मात्र, ते तिघेही हॉटेलला न जाता परस्पर घरी गेल्याचे उघडकीस आले.
२६ डिसेंबरपासून त्यांचे हॉटेलमधील आरक्षण रद्द झाल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापणाने पालिकेला दिली. देशाबाहेरून आलेल्या व्यक्तीने ७ दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन या तिघांनी केले. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असे वर्तन त्यांनी केले. यासाठी साथ नियंत्रण कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड सहिता १८६० अन्वये गुन्हा दाखल करावा, असे पालिकेने खार पोलिसांना कळविले होते. त्यानुसार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भायखळ्यात क्वारंटाईन केले जाईल
पोलिसांकडून या तिघांना रात्री ताब्यात घेतले जाऊ शकते. या तिघांनी गुन्हा केला असल्याने या तिघांना भायखळ्याच्या रिचर्डसन अॅन्ड क्रुडास येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात येईल आणि त्याच ठिकाणी क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती आहे.
हेही वाचा - नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे