मुंबई - शहरामध्ये एक वर्ष झाले तरी कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाही. त्यासाठी पालिकेने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी केअरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोहर खान या अभिनेत्रीने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या अभिनेत्रीने खोटा कोरोना रिपोर्ट बनवला तसेच त्याद्वारे लोकांमध्ये फिरल्याने कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप गोहर खानवर ठेवण्यात आला आहे.
अभिनेत्री विरोधात एफआयआर
अभिनेत्री गोहर खान ओशिवरा विभागात राहते. तिच्याकडे 11 तारखेला ती पॉझिटिव्ह असल्याचा तर 12 तारखेला दिल्लीचा निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट आढळून आले आहेत. गोहर खान पॉझिटिव्ह असताना ती लोकांमध्ये मिसळत असल्याचा तसेच शूटिंग करत असल्याचा प्रकार समोर आला. तिची चौकशी केली असता ती दिल्लीचा खोटा रिपोर्ट घेऊन बाहेर फिरत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गोहर खानवर ओशिवरा पोलीस ठाण्यात साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
महानगर पालिकेकडून कडक कारवाई
मुंबईत गेल्या मार्चमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. जुलै पर्यंत काही प्रमाणात कोरोना कमी करण्यात पालिकेला यश आले होते. मात्र ऑगस्टमध्ये आलेल्या धार्मिक सणानंतर पुन्हा कोरोना वाढला. डिसेंबर जानेवारीदरम्यान पुन्हा कोरोनाचा प्रसार कमी झाला. फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने पालिकेने कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. रुग्ण आढळून येणारे इमारतीमधील मजले सिल केले जात आहेत. एकाच इमारतींमध्ये 5 रुग्ण आढळून आल्यास इमारत सील केली जात आहे. एकाच विभागात जास्त रुग्ण आढळून आल्यास तो विभाग चाळी, झोपडपट्टीचा असल्यास तो विभाग कंटेंनमेंट झोन म्हणून सील केला जात आहे. तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह किंवा रुग्णाच्या संपर्कात आलेल्याना क्वारंटाईन केले जात आहे. क्वारंटाईन असलेले रुग्ण किंवा संपर्कातील लोक बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.
हेही वाचा-नागपूर; एलआयसी कॉलनीत ३५ लोकांना कोरोनाची लागण; कॉलनी सील