मुंबई - प्रसिद्ध कुस्तीपटू व मुंबई पोलीस खात्यात कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त पोलीस नरसिंग यादव हे संजय निरुपम यांच्या प्रचारात सहभागी झाल्याच्या कारणावरून आंबोली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या वृत्ताला मुंबई पोलीस प्रवक्ते मंजुनाथ शिंगे यांनी दुजोरा दिला असून यादव काँग्रेस उमेदवार संजय निरूपम यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे समजते.
रविवार २३ एप्रिल रोजी जोगेश्वरीच्या यादव नगरमध्ये संजय निरुपम यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत नरसिंग यादव स्वतः सरकारी कर्मचारी असतानाही राजकीय मंचावर हजर होते. तसेच त्यांनी निरुपम यांना पाठिंबा जाहीर केला. ही बाब तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी नोंदवली आणि सोमवारी त्यांच्या विरोधात प्रचारात सहभागी झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
या प्रकरणाची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली आहे. सरकार त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे शिंगे यांनी सांगितले. जोगेश्वरीच्या यादव नगरमध्येच नरसिंग यादव लहानाचे मोठे झाले आहेत. तेथे त्यांना मानणारा मोठा यादव समाज असल्याने ते त्या सभेला निरुपम यांना पाठींबा देण्यासाठी आले होते. निरुपम यांना पाठींबा देणे यादव यांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.