मुंबई : केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा मानला जाणारा प्रकल्प म्हणजे मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कॉरिडॉर मार्गीकेचा डी.पी.आर म्हणजेच अंतिम आराखडा राष्ट्रीय हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने रेल्वे मंत्रालयाला नुकताच सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून हा आराखडा आता रीतसर रेल्वे मंडळाला सादर केल्यानंतर त्याला मान्यता घेतली जाईल या मान्यतेनंतर प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती एन.एच.आर.सी. एलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
पीएमआरडीएचाही प्रस्तावित विकास आराखड्यात नोंद : मुंबईहून हैदराबादला जाणारा हा मार्ग पुण्यातून जाणार आहे त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाचा मार्ग पीएमआरडीएच्या हद्दीतून लोणावळा देहू आणि सासवड या भागातून पुढे जाणार आहे. त्यामुळे याबाबतची नोंद पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात करावी असे पत्राद्वारे एन.एच.आर.सी.एल ने पुणे महापालिकेला कळवले होते. त्यानुसार आता पी.एम.आर.डी.ए ने प्रस्तावित विकास आराखड्यात हा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे या प्रकल्पात असलेला मोठा अडथळा दूर झाला असून हाच मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या 11 गावांमधील फुरसुंगी, लोहगाव या गावांच्या हद्दीतूनही जातो.
आराखडा रेल्वे मंत्रालयाकडे सादर : फुरसुंगी येथील दुसऱ्या नगररचना योजनेचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे ही दोन गावे वगळता उर्वरित गावांचा विकास आराखड्याचे काम पुणे महापालिकेकडून अंतिम करण्यात आले आहे. मात्र, नगर रचना योजना आणि विकास आराखडा यामध्ये हा मार्ग अद्यापही दर्शविण्यात आलेला नाही. महापालिकेने याबाबत मान्यता दिल्यानंतर सल्लागार कंपनीकडून रेल्वेच्या मार्गीकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो महापालिकेकडे सादर करण्यात आला होता. मात्र, याबाबतची छाननी अद्यापही सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेशनकडून तो आराखडा रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.