मुंबई - चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात काल (सोमवारी) काही तांत्रिक अडचणींमुळे तक्रार दाखल होऊ शकली नाही. तसेच ते नेमके कोणत्या पोलीस ठाण्यात अंतर्गत येतात हे ठरु शकले नाही. त्यामुळे कश्यप यांच्याविरोधात ही तक्रार आज (मंगळवारी) दाखल होण्याची शक्यता आहे. 'पटेल की पंजाबी वेडिंग' चित्रपटाची अभिनेत्री पायल घोष यांनी अनुराग कश्यपविरूद्ध लैगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
पायल म्हणाल्या की, 'अनुराग कश्यप हे दर्शवितो की तो महिलांचा आदर करतो. मात्र, वास्तविक जीवनात ते तसे नाही. ते मुखवटा घालतात. पहिल्याच दिवशी त्याने मला चांगली वागणूक दिली. मात्र, जेव्हा त्याने मला त्याच्या सिनेमाच्या लायब्ररीत बोलावले तेव्हा त्याने माझ्याशी गैरवर्तन केले. मी त्यांना सांगितले की, हे योग्य नाही. त्यावर त्यांनी सांगितले की त्यांनी बर्याच अभिनेत्री लाँच केल्या आहेत.' दरम्यान, पायल यांच्यासोबत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताना त्यांचे वकील अॅड. नितीन सातपुते हेही उपस्थित होते.
काय आहे प्रकरण?
पायल घोष या अभिनेत्रीने 'मी टू' मोहिमेचा आधार घेत अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले आहेत. अनुराग कश्यपने आपल्यावर बळजबरी केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. ट्विटरवर याबाबत लिहित, तिने अनुरागला अटक करण्याचीही मागणी केली आहे. तर, पायलच्या या ट्विटला रिट्विट करत कंगना रणौतनेही अनुरागला अटक करण्याची मागणी केली आहे. "एव्हरी व्हॉईस मॅटर्स, मी टू, अरेस्ट अनुराग कश्यप" असे कंगनाने म्हटले आहे. दरम्यान, पायल घोषने आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनुराग कश्यप या दोघांनाही टॅग केले आहे. "मोदीजी, कृपया अनुरागवर कारवाई करा, जेणेकरुन त्याच्या चेहऱ्यामागचा सैतान सर्वांसमोर येईल. मला माहिती आहे माझ्या ट्विटमुळे मला धोका निर्माण होईल, त्यामुळे कृपया मदत करा" अशा आशयाचे ट्विट या अभिनेत्रीने केले आहे.
तर अभिनेत्री पायल घोष हिने चित्रपट निर्माते अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यावर चित्रपटसृष्टीतील मित्रांनी अनुराग कश्यपची बाजू घेतली आहे. अनुभव सिन्हा, टिस्का चोप्रा आणि सुरवीन चावला हे कश्यप यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. अनुभव सिन्हा यांनी #MeToo चळवळीचे अस्तित्व छळ झालेल्या महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणे हे आहे, त्याचा गैरवापर होऊ नये, असे म्हटले आहे. सुरवीन चावलाने चित्रपट निर्माता कश्यप याच्याबरोबर त्यांच्या सेक्रेड गेम्सच्या दोन भागांच्या नेटफ्लिक्स मालिकेत काम केले होते. तिने या दिग्दर्शकाविरोधातील आरोप हा संधीसाधूपणा असल्याचे म्हटले आहे. ‘छूरी’ या लघुपटामध्ये कश्यप आणि चावला यांच्यासोबत असलेल्या टिस्का चोप्रानेही कश्यपची बाजू घेतली आहे. चित्रपट निर्माता कश्यप हे पुरुष किंवा महिलेतील प्रतिभेला वाव देणारे आहेत, असे म्हटले आहे.
कश्यप यांनी आरोप फेटाळले...
अभिनेत्री पायल घोषने केलेल्या आरोपांबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने मौन सोडले आहे. पायलचे आरोप बिनबुडाचे असून, आपण स्वतः कोणत्याही महिलेला त्रास देत नाही, तसेच आपल्या आजूबाजूलाही अशा घटना होऊ देत नसल्याचे अनुरागने म्हटले आहे. "ज्या प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत, अशा प्रकारचा व्यवहार ना मी स्वतः करतो, ना माझ्या आजूबाजूला होऊ देतो. पुढे काय होते ते आपण पाहूच. तुझा व्हिडीओ पाहूनच कळते, की त्यात किती खरे आणि किती खोटे आहे. तुला आशीर्वाद आणि प्रेम. तुझ्या इंग्लिशला मी हिंदीमध्ये उत्तर दिल्याबद्दल क्षमस्व", अशा आशयाचे ट्विट करत त्याने पायलला उत्तर दिले आहे.