मुंबई - मुंबईत गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करताना, शहरात स्वच्छता ठेवताना कोरोनाची लागण होऊन महानगरपालिकेच्या 81 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोना योद्धांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करता यावी. म्हणून, मृत कर्मचाऱ्यांच्या कुंटुंबीयांनी दोन दिवसात नुकसानभरपाईचे दावे दाखल करावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे.
कोरोनाविरोधातील युद्धात आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या 2 हजारांपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाराऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 81 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, 81 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 2 जणांचे दावे दाखल झाले आहेत. तर 9 जणांच्या दाव्यांच्या कागदपत्रांची मुख्य अधिकाऱ्यांकडून खातरजमा करून घेण्यात येत आहे. उर्वरीत 70 दावे अद्याप दाखल झालेले नाहीत. मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी कागदपत्रे जमा केली नाहीत. त्यामुळे दावे दाखल करता आले नाहीत.
पालिकेतील कर्मचारी आपल्या दिवंगत सहकाऱ्यांच्या नातेवाईकांना कागदपत्रे जमा करण्यासाठी निश्चितच मदत करतील. येत्या दोन दिवसात तातडीने दावे दाखल करा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. कोरोनामुळे पालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील एका वारसाला पालिकेच्या सेवेत सामावून घेतले जाईल आणि कुटुंबाला ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल, असे पालिका प्रशासनाने याआधीच जाहीर केले आहे.