मुंबई - मेडिक्लेम आणि कॅशलेस विम्याच्या नावाखाली मुलुंड येथील एका रुग्णालयाने आणि औषध विक्रेत्यांने विमा कंपन्यांना तब्बल 27 लाख 56 हजार 805 रुपयांचा चुना लावला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) याप्रकरणाची चौकशी करत अखेर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मुलुंड, एम. जी. रोडवरील सारथी रुग्णालय आणि श्री गणेश मेडिकल यांच्याकडून मेडिक्लेम आणि कॅशलेस विम्याच्या बिलांमध्ये काही तरी तफावत असल्याच्या तक्रारी एफडीएला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार याप्रकरणाची चौकशी केली असता रुग्णालय आणि मेडिकलचा मालक देवीसिंग भाटी हे बोगस बिल तयार करत असल्याचे निष्पन्न झाले. बिलांमध्ये महागडी औषधे असतात. मात्र, त्यांचा वापर रुग्णांसाठी केलाच जात नाही. यावरून बोगस बिले तयार करत विमा कंपन्यांकडून रक्कम काढत असल्याचेही समोर आले.
हेही वाचा - BREAKING : मंत्रालयातही कोरोनाचा संशयित रुग्ण
औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याचा हा भंग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार एफडीएने अखेर मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.