मुंबई - घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत राहणाऱ्या भार्गवी दुपारे या मुलीचा काही महिन्यांपूर्वी खासगी रुग्णालयात उपाचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर आपल्या मुलीच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे आज (बुधवार) मृत मुलीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी भीम आर्मी संघटनेच्या सोबत रुग्णालय प्रशासनाच्याविरोधात आंदोलन केले.
हेही वाचा... कंपनीचा ई-मेल हॅक करून लाखोंची फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
जेजे रुग्णालयामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी भार्गवी नरेश दुपारे या मुलीला नातेवाईकांनी 13 जुलै रोजी रात्री दोन वाजता घाटकोपरच्या सपना हेल्थ केअर सेंटर या खासगी दवाखान्यात दाखल केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी तिची तब्येत अचानक बिघडली. रात्री मुलगी आमच्या सोबत व्यवस्थित बोलल्याचे नातेवाईकांनी सांगितले, मात्र तिच्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य प्रकारे उपचार केले नाहीत, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
हेही वाचा... २७ महापालिकेसाठी महापौर आरक्षण जाहीर, १६ शहरांमध्ये खुल्या वर्गातील महापौर
त्यावेळी वडिलांनी मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात न घेता विरोध केला होता. तेव्हा पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई रुग्णालयावर करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, पाच महिन्यानंतरही पोलीस प्रशासनाने रुग्णालय व डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने पालकांनी विविध ठिकाणी पत्रव्यवहार केला होता. परंतु, त्यावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज मृत मुलीचे वडील नरेश दुपारे यांनी आणि भीम आर्मी संघटना व मुलीचे नातेवाईक यांनी रमाबाई कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे निषेध आंदोलन केले. यावेळी घाटकोपर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कुंडलिक निगडे यांनी, तपास संस्थाकडील अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
हेही वाचा... 'आमची भेट झाली हिच मोठी सकारात्मक बाब'