मुंबई - ऐन खरीप हंगामात कोरोनाचा कहर सुरु आहे. अशात राज्यामध्ये खराब बियाणे, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खासगी सावकारांसह बॅंकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा आणि कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे झालेली कोंडी या प्रमुख कारणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. असे असले तरी चांगली बाब म्हणजे, या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे. जानेवारी ते मे 2020 या कालावधीत 826 शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिली. मार्च ते मे या लॉकडाऊन काळात राज्यात 427 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे.
देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास राज्य व केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मागील पाच महिन्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या (437) विदर्भाच्या 11 जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ मराठवाड्यात (273) शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मे 2020 अखेर पश्चिम महाराष्ट्रात 12 तर उत्तर महाराष्ट्रात 104 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात कर्जमाफी योजनेची घोषणा झाल्यानंतर त्यापूर्वी नोव्हेंबर 2019 मधे 308 शेतकरी आत्महत्या होत्या. तर डिसेंबर महिन्यात कर्जमाफी घोषित झाल्यानंतर 242 शेतकरी आत्महत्या होऊन आकडेवारीत घट झाली होती. डिसेंबर अखेर राज्य सरकारच्या कर्जमाफीमधील 10 हजार कोटींचे वितरण 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात झाले होते.
आतापर्यंत राज्यातील 25.77 लाख खातेदारांना 16 हजार 690 कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019' ही कर्जमुक्ती योजना जाहिर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-19 चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहिर झाला. कोविड-19 चा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला होता. या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
2001 पासून मे 2020 पर्यंत राज्यात तब्बल 34 हजार 200 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आपली जीवनयात्रा संपविली आहे. लॉकडाउन काळात आत्महत्या केलेल्या बाराशे शेतकऱ्यांपैकी साडेचारशे शेतकऱ्यांनाच सरकारी मदत मिळाली असून उर्वरित प्रस्तावांची छाननी अद्यापही सुरुच आहे. मागील 20 वर्षांत सर्वाधिक 15 हजार 221 शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्या असून त्यानंतर औरंगाबाद विभागात 7 हजार 791 शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे. विविध संकटांचा सामना करत जगाचा पोशिंदा बळीराजाला यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनचा नवा अनुभव आला. आत्महत्यांमधे घट झाल्याबद्दल राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी समाधान व्यक्त केले आहे. आम्ही शेतकरी कल्याणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. कर्जपुरवठा, कर्जमुक्ती बोगस बियाणे कारवाई आणि खरीप यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत असल्याचे, मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
1 जानेवारी ते 31 मे 2020 पर्यंत शेतकरी आत्महत्या -
कोकण विभाग : 0
पुणे विभाग : 12
नाशिक विभाग : 104
अमरावती विभाग : 361
नागपूर विभाग : 76
औरंगाबाद विभाग : 273
एकूण शेतकरी आत्महत्या : 826
लॉकडाउनमुळे मदतीचे प्रस्ताव पडून -
कोरोनाचे वैश्विक संकट दूर करण्याच्या हेतूने 22 मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जानेवारी ते मे 2020 या कालावधीत राज्यातील 826 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी 246 शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले असून 135 अपात्र ठरले आहेत. उर्वरित 445 शेतकऱ्यांच्या प्रस्ताव प्रलंबीत आहे. लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी कमी असल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागेल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊन काळातील शेतकरी आत्महत्या :
(मार्च ते मे २०२०)
मार्च : १६८
एप्रिल :१०२
मे : १५७
एकूण लॉकडाऊन काळातील शेतकरी आत्महत्या : ४२७
हेही वाचा - काँग्रेस नाराज..! महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
हेही वाचा - अर्ध्या महाराष्ट्राची तहान भागवणारे मुख्यमंत्री म्हणजे शंकरराव चव्हाण, मधुकर भावेंनी दिला आठवणींना उजाळा