मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर विरोधक आक्रमक झालेले पहायला भेटत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागलेला असताना राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांना १२ तास वीज, त्यांच्या शेतीमालाला योग्य मोबदला यासारख्या अनेक मागण्या या अधिवेशनातच होत असल्याने त्यावर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना सातत्याने विधिमंडळात रंगत आहे. हे सर्व याची देही याची डोळा पाहण्याची इच्छा पारनेर येथील शेतकऱ्यांना झाली. त्यांनी ती इच्छा त्यांचे आमदार निलेश लंके यांच्याकडे बोलून दाखवली. त्या अनुषंगाने आज निलेश लंके हे शेतकऱ्यांना घेऊन थेट मुंबई, विधान भवनात दाखल झाले.
आमची बाजू कोण मांडते? : विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर स्थानिक प्रतिनिधी व सरकार व विरोधक कशा प्रकारे भूमिका घेतात हे वास्तविकतेमध्ये पाहण्यासाठी शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागली होती. व ही बाब त्यांनी त्यांचे आमदार निलेश लंके यांना बोलून दाखवली. व निलेश लंके यांनी या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत विधान भवन गाठले. याप्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले की, मी २०१९ साली विधानसभा निवडणूक लढलो ती लोक वर्गणीतून व त्यांनीच मला आमदार केले. त्यानंतर माझ्या सर्व शेतकरी बांधवांचा आग्रह होता की आम्हाला अधिवेशनाचे कामकाज पाहायचे आहे. तू तिथे कशा पद्धतीने काम करतो. हे आम्हाला बघायचे आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ सुरू असतो. तो कशा पद्धतीने होतो. आमची बाजू कोण लावून धरत, हे सर्व आम्हाला जवळून पाहायचे आहे. व म्हणूनच या सर्व कारणासाठी शेतकऱ्यांची इच्छा म्हणून त्यांना विधिमंडळात कामकाज पाहण्यासाठी घेऊन आल्याच निलेश लंके यांनी सांगितल आहे.
वाऱ्यावर इमारत हलते की काय? : याबाबत निलेश लंके म्हणतात की,शेतकरी वाचला तर देश वाचेल. शेतकऱ्यांच्या बाजारभावाला योग्य ती किंमत भेटली पाहिजे. शेतकरी हा आपला पोशिंदा आहे. म्हणून त्यांची मुंबई, विशेष करून विधान भवन बघण्याची इच्छा मी तात्काळ पूर्ण केली. यातील बरेच शेतकरी हे पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, एकदा तरी आयुष्यात मुंबई पहावी. म्हणून हे फार मोठ्या उत्साहाने मुंबईत आले आहेत. विधानभवनाची उंच इमारत बघितल्यावर
इतकी उंच इमारत वारा आल्यावर हलते की काय? असा त्यांना प्रश्न पडला, असेही लंके म्हणाले.
विधान भवन बघून आनंद : आमच्या न्याय हक्कासाठी लढणारे विधान भवन बघून आनंद झाला. निलेश लंके यांच्यासोबत आलेले आमदार हे त्यांचे अत्यंत विश्वासातले असून हे माझ्यावर निगराणी राखणारे आहेत असे लंके म्हणाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर या शेतकऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर फोटो सुद्धा काढला. तसेच विधानभवनात येणारे, जाणारे आमदार, मंत्री, अधिकारी यांच्याकडे बघून त्यांच्या नजरा चक्रावल्या होत्या. विधानभवनाच्या आवारात प्रवेश करतात मीडियाचे कॅमेरे, फोटोग्राफर यांच्या कॅमेरेमधून निघालेल्या लखलखाटाने काही क्षणासाठी ते भारावूनच गेले.
अनेकजण पहिल्यांदा मुंबईत : आम्ही आतापर्यंत विधान भवन बाबत ऐकून होतो. हे सर्व कधी कधी टीव्हीवर पाहिल आहे. परंतु प्रत्यक्षात आज अनुभवायला भेटले. अनेक मोठे नेते दिसले. त्यांच्यातील काहींबरोबर फोटोही काढले. यापूर्वीही अनेक वर्षांपूर्वी कधी मुंबईत आलो आहोत. परंतु आताची मुंबई बदलली आहे. आमच्यातील अनेकजण पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. अजून मुंबईत फिरण्यासारखं बरच आहे, परंतु आमच्या प्रश्नावर जिथे न्यायनिवाडा होतो, ते विधान भवन बघून फार बरं वाटलं अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी दिली आहे.