मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका चालकांकडून अवाजवी दर सर्वसामान्य नागरिकांकडून आकरल्या जात होते. याबाबत अनेक तक्रारीसुद्धा परिवहन विभागाकडे आलेल्या होत्या. याची दखल घेऊन राज्यभरात चंद्रपूर पॅटर्न अंतर्गत राज्यभरातील रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चिती करण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिकेच्या नव्या भाडेदराची माहिती देणारे पत्रक सर्व रुग्णवाहिकांवर लावण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निश्चित भाडेदराहून अधिक दर आकारणी करणाऱ्यांविरोधात आर्थिक दंड व गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
भाडेदर पत्रक रुग्णवाहिकेवर लावणार -
नुकतेच चंद्रपूर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कार्यालयाने अवाजवी दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकेच्या विरोधात कारवाई केली. यानंतर रुग्णवाहिकेच्या भाडेदर निश्चित करण्यात आली आहेत. चंद्रपूर परिवहन विभागाचा (आरटीओ) हा पॅटर्न राज्यातील ५० आरटीओंमध्ये राबवण्याचे आदेश दिल्याची माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली. त्यानुसार स्थानिक आरटीओ कार्यालयाकडून रुग्णवाहिकेचा प्रकार आणि रुग्णवाहिकेस कापावे लागणारे अंतर व संबंधित अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ याचा विचार करण्यात आला आहे. तसेच रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना ही माहिती मिळावी म्हणून भाडेदर पत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस लावणे चालक व मालकास बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहितीही आयुक्त ढाकणे यांनी दिली.
अतिरिक्त रक्कम आकारता येणार नाही -
आरटीओ कार्यालयाने रुग्णवाहिकेच्या भाडेदरामध्ये चालकाचा पगार व इंधनाचा खर्च समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे चालकाच्या दैनंदिन भत्त्यापोटी अतिरिक्त रक्कम रुग्णाच्या नातेवाईकांकडून आकारता येणार नाही. तसेच वाहन तांत्रिकदृष्ट्या सक्षम व स्वच्छ ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी आरटीओने चालक व मालकांवर ठेवली आहे. तसेच रुग्णवाहिकेत कोणताही तांत्रिक किंवा अन्य दोष उद्भवला, तर त्याची जबाबदारी चालक व मालकाची राहील. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकाकडून कुठल्याही प्रकारे निश्चित भाडेदराव्यतिरिक्त अधिकची रक्कम वसूल केल्यास त्यांच्यावर आरटीओ कार्यालयाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा - चिखलीतील 10 खासगी कोविड रुग्णालयातील 13 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे
किती दंड होणार -
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालक किंवा मालकांविरोधात पहिल्या गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.
काय आहे 'चंद्रपूर पॅटर्न' -
गेल्या काही दिवसापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णालय गाठण्यासाठी अवाजवी दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चिती करण्याचे काम स्थानिक आरटीओने केले. तसेच रुग्णवाहिकेच्या नव्या भाडेदराची माहिती देणारे स्टीकर सर्व रुग्णवाहिकांवर लावण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या २५ किलोमीटर किंवा दोन तासाच्या अंतरासाठी चंद्रपूर आरटीओने मारुती व्हॅनसाठी ८०० रुपये दर ठरवले. तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये दराने आकारणी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे २५ किलोमीटर किंवा दोन तास या पहिल्या टप्प्यासाठी टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीने बांधलेल्या रुग्णवाहिकेसाठी ९०० रुपये व त्यानंतर प्रती किलोमीटर १५ रुपये दर आकारता येतील. याउलट आयसीयू किंवा वातानुकूलित रुग्णवाहिकेसाठी २५ किलोमीटरपर्यंत सरसकट २ हजार रुपये आणि त्यानंतर प्रती किलोमीटर २५ रुपये भाडेदर निश्चिती केले. यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांची लूट थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे चंद्रपूर पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय परिवहन आयुक्त कार्यालयाने घेतलेला आहे.
हेही वाचा - अंबरनाथमध्ये 'सैराट'; प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची हत्या