मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपल्या नातू पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानाबद्दल अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार हे नाराज आहेत, असे त्यांच्या मागील काही दिवसात सुरू असलेल्या घटनाक्रमावरून दिसते. या नाराजीतूनच, त्यांच्याकडून करण्यात आलेल्या राम मंदिर विषयी समर्थन आणि सुशांत सिंह प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जाऊन सीबीआयची मागणी केली असावी, अशी चर्चा आहे. यानंतर पार्थ यांची मागणी विरोधकांनी उचलून धरत राष्ट्रवादीच्या मर्मावर बोट ठेवले. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यात पार्थ पवारांची नाराजी की, राष्ट्रवादीची नवी राजकीय खेळी? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पार्थ पवार यांना मावळ मतदार लोकसभा संघातून यश आले असते तर आज ते राष्ट्रवादीचे तरुण नेते म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबरीने त्यांचे कामकाज सुरू राहिले असते. मात्र, मावळमध्ये मुळातच तिकीट मिळताना शरद पवार यांची नाराजी आणि त्यानंतर आलेले अपयश पार्थला बोचत असणार असे बोलले जात आहे. दुसरीकडे मावळच्या अपयशानंतर पार्थला राज्यातही कुठे मोठी संधी मिळाली नाही. यामुळे घरात सत्ता असतानाही पार्थला आपण कुठे आहोत ही भावना सतावत असणार आहे. एक भाऊ आमदार, वडील मंत्री, आत्या, आजोबा खासदार आपण कुठेच नाही, यामुळे यातून निर्माण झालेला उद्वेग आणि आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न पार्थकडून केला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते आहे.
पार्थ पवार यांच्या मामाचा मुलगाा राणा जगजितसिंह हे भाजपामध्ये गेले. यानंतर ते खासदार झाले. इतकेच नाही तर काही तासांसाठी का असेना, वडीलही भाजपाच्या जवळ जाऊन सत्तेत बसले होते. या सर्व प्रकारामुळे भाजपा राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य पक्ष राहिलेला नाही, असा संदेश राष्ट्रवादीचीच तिसरी पिढी देण्याचा हा प्रयत्न तर करत नाही ना? अशी चर्चा आणि सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे.
मागील काही दिवसांत महाविकास आघाडीत निर्णय आणि अधिकाराच्या विषयावरुन धुसफूस सुरुच आहे. त्यामुळे ज्या प्रकारची अस्थिरता राज्यात तीन पक्षांमुळे निर्माण झाली आहे, त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी फुटली तर भाजपासोबत जाण्याचा पर्याय खुला राहावा, म्हणून वरिष्ठांच्या संमतीने पार्थ पवारकडून अशी सूचक वक्तव्य केली जात असावी, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पार्थची अस्वस्थता राष्ट्रवादीचे भावी डावपेच असावेत, असे सर्व हे घटनाक्रम लक्षात घेताना वाटते.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत नाही हे माध्यमांसमोर सांगितले होते. पार्थच्या माध्यमातून घरातील गोष्टी बाहेर आल्याने पवार यांचा हा संताप होता, की रणनीती उघड होते म्हणून पवारांनी हे विधान केले असावे याचा अंदाज अनेक राजकीय विश्लेषकांना लावणे कठीण आहे. पार्थ पवार हे वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतात, अशा चर्चा यातूनच बाहेर आली असावी. गुरुवारी सिल्वर ओक बंगल्यावर पार्थ पवार यांना बोलावून घेऊन बंद खोलीत खासदार सुप्रिया सुळे आणि त्यासोबत पवारांनी काय कान टोचले, की मनधरणी केली हेही समोर आले नाही. मात्र, आज पुन्हा पार्थ यांनी आदिवासी समाजाच्या संदर्भात केलेल्या एका ट्विटवरुन पार्थ यांचा आपले अस्तित्व शोधण्याचा एक आटापिटा करत असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.