मुंबई - सोशल मीडियावर महापालिकेच्या रुग्णालय व लसीकरण केंद्रांवर सुविधा नसल्याचे, गर्दी झाल्याचे खोटे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. हे सर्व व्हिडिओ चुकीचे असून पालिकेच्या लसिकरणाचे काम शांततेत, सुरळीत सुरू आहे. तसेच कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी न करणारे पाच नागरिक इतर मुंबईकरांना अडचणीत आणत आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
महापौरांनी घेतला आढावा
मुंबई महापालिका रुग्णालय व लसीकरण केंद्रांवर सोयी सुविधा नसल्याचे, गर्दी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. याची शहानिशा करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा, नायर, सायन आणि केईएम रुग्णालयांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान महापौरांनी लसीकरण केंद्र आणि रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर महापौर बोलत होत्या.
महापालिकेचे काम योग्यच
यावेळी बोलताना, पालिका रुग्णालयाचे व्हिडिओ असल्याचे सांगून काही व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. यासाठी नेमकी परिस्थिती काय हे पाहण्यासाठी आज रुग्णालयांना भेटी दिल्या. सर्वत्र लसीकरण सुरळीत व शांततेत सुरू आहे. जे काही व्हिडिओ पालिकेच्या नावाने व्हायरल केले जात आहेत ते चुकीचे आहेत. महापालिकेचे काम योग्य प्रकारे सुरू आहे, असे महापौर म्हणाल्या.
पाच टक्के बेजबाबदार नागरिक
मुंबईत कोरोना रुग्ण वाढत आहेत, याची चिंता सर्वाना आहे. नागरिकांनी आपले कुटूंब कोरोनापासून वाचवण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. 95 टक्के नागरिक मास्क व कोरोना त्रिसूत्रीचे पालन करत आहेत. मात्र, 5 टक्के बेजबाबदार लोक मास्कचा वापर करत नाहीत. ते बेजबाबदार लोक मुंबईकरांना अडचणीत आणत आहेत. मुंबईकर अडचणीत येऊ नयेत म्हणून लसीकरण लवकर पूर्ण करावे, अशा सूचना देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
तर हेल्पलाईनवर संपर्क साधा
झोपडपट्टीपेक्षा निवासी इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्यावर भर द्यावा तसेच विलगीकरण करावे, असे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित पालिका अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे लसीकरणानंतर काहीही त्रास जाणवल्यास आपल्याला दिलेल्या फॉर्मवर हेल्पलाईन क्रमांक दिलेला असून या क्रमांकावर आपण कधीही संपर्क साधावा, असे आवाहन महापौरांनी लाभार्थ्यांना केले.
हेही वाचा - 'सेव्ह द लाईव्हज' उपक्रमामुळे कोरोना मृत्यू दर कमी करण्यात महापालिकेला यश
हेही वाचा - राज्यात आज कोरोनामुळे ८८ रुग्णांचा मृत्यू; रुग्णसंख्या वाढतीच