मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना लागणारा १ हजार ७८४ मेट्रिक टन ऑक्सिजनचा सर्व पुरवठा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून मोदींचे आभार मानले. हा फडणवीस यांचा खोटारडेपणा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या यादीत बहुसंख्य महाराष्ट्राच्या कंपन्या आहेत. १ हजार २५० मेट्रीक टन ऑक्सिजन हे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील या कंपन्यांच्या माध्यमातूनच मिळवले आहे. या कंपन्या महाराष्ट्राच्या भूमीवर असल्याने त्यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. ही क्षमता महाराष्ट्राची स्वतःची आहे. पण, हेही फडणवीस यांनी मोदींच्या नावावर खपवले व सर्व श्रेय मोदींना देण्याचा खोटेपणा केला, तो थांबवावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.
हेही वाचा - प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द
राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यानंतर महाराष्ट्राची गरज जवळपास १ हजार ७५० मेट्रिक टनाच्या पलिकडे गेली आहे. म्हणून महाराष्ट्राने स्वतःच्या १ हजार २५० मेट्रिक टन क्षमतेव्यतिरिक्त केंद्राकडे ५०० मेट्रिक टन अधिकच्या ऑक्सिजनचा पुरवठा इतर राज्यांतून करावा, अशी मागणी केली होती. केंद्राकडून त्यातील भिलाई केंद्रातून ११० मे.टन प्रति दिवस, बेलारी ५० मे.टन प्रति दिवस, जामनगरमधून १२५ मे.टन प्रति दिवस, व्हायजॅग येथून ६० मे. टन सरासरी ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. आणि ऑक्सिजन एक्सप्रेसने ७ टँकरने एकदाच ११० मे.टन आणले आहे, असे सावंत म्हणाले.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांत एकंदर २५ हजार मे. टन ऑक्सिजनची आवश्यकता व्यक्त केली होती. १ हजार २५० मेट्रिक टन प्रति दिवस पकडून पंधरा दिवसांत १७ हजार ५०० मे.टन महाराष्ट्राची स्वतःची क्षमता होती. केंद्राला या १५ दिवसांत ७ हजार ५०० मे.टन म्हणजे ५०० मे.टन प्रति दिवस ऑक्सिजनचा पुरवठा करायचा होता. परंतु, सध्या ३४५ मे.टन प्रति दिवस इतकाच पुरवठा केंद्राकडून होत आहे. उरलेल्यासाठी वाहतुकीच्या अडचणी येत आहेत. असे असताना सर्व ऑक्सिजन पुरवला, अशा थापा फडणवीस यांच्याकडून मारल्या गेल्याची टीका सचिन सावंत यांनी केली.
भाजपच्या नेत्यांची मानसिकता अस्थिर
तसेच, राज्यातील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मानसिकता अस्थिर झालेली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी जनतेची दिशाभूल करत खोटे बोल, पण रेटून बोल ही कार्यपद्धती हाती घेतली आहे. महाराष्ट्राने पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली होती. त्याचासुद्धा पुरवठा मोदी सरकार करू शकत नाही आणि वरून खोटे बोलून भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, हे दुर्दैवी असून कृपया खोटे बोलणे थांबवा, ही विनंती सावंत यांनी केली.
हेही वाचा - राज्यात 24 तासांत 71 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त