मुंबई - राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेचे खासदार व धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते डॉ. विकास महात्मे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईत राजभवन येथे भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्यावतीने अमरावती येथे राज्यस्तरीय 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार' प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यंदा अमरावती येथे होत असलेल्या या पुरस्काराच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे अशी विनंती करणारे निवेदन डॉ. महात्मे यांनी आज राज्यपालांना दिले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे, उपाध्यक्ष डॉ. संतोष काळे, सचिव माधुरी ढवळे, आदी उपस्थित होते.
'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार' वितरणाचा सोहळा अमरावती येथे सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतला जाणार आहे. देशभरातील कर्तृत्ववान महिलांची या पुरस्कारासाठी निवड केली जात असल्याची माहिती डॉ. महात्मे यांनी दिली.
राज्यात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने मागील चार वर्षांहून अधिक काळापासून 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार' प्रदान केला जात आहे. यापूर्वी हा पुरस्कार अॅड. उज्ज्वल निकम, सिंधुताई सपकाळ, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.