मुंबई - डब्बेवाला असोसिएशनचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर यांना फसवणूक प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी काल रात्री पुणे येथून अटक केली आहे. डबेवाल्यांना सायकल ऐवजी दुचाकी घेऊन देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. त्यांना विक्रोळी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
डब्बेवाले डब्बा पोहचवण्यासाठी सायकलचा वापर करतात. मात्र, हा वेळ वाचवा यासाठी त्यांना सायकल ऐवजी दुचाकी देण्यात येणार असल्याचं सुभाष तळेकर डब्बेवाल्यांना सांगितले होते. ही स्कीम देत असताना सुरुवातीला मोफत दुचाकी देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर तळेकर यांनी पैसे घेतले. मात्र, पैसे देऊनही दुचाकी मिळत नसल्याने डबेवाल्यांनी अखेर घाटकोपर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तळेकर यांना अटक केली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करत आहे.
डबेवाला संघटनेचे माजी प्रवक्ते सुभाष तळेकर अटकेत काय आहे पूर्ण प्रकरणनवी मुंबईतील एका पतपेढी संस्थेच्या मदतीने मुंबईच्या डबेवाल्यांना मोफत टीव्हीएस मोपेड ही दुचाकी देणार असल्याचं सांगून सुभाष तळेकर याने 60 डबेवाल्यांकडून त्यांची कागदपत्रे गोळा केली होती. त्यानुसार काही डबेवाल्यांना दुचाकी मिळाल्या खऱ्या परंतु त्यांना आरटीओचा परवाना नव्हता सोबतच अनेक डबेवाल्यांना दुचाकी तर मिळाली नाहीच परंतू त्यांच्या खात्यातून पैसेदेखील वजा व्हायला सुरुवात झाली. तसेच काही डबेवाल्यांना कर्ज फेडण्यासाठी पतपेढी करून फोन देखील येऊ लागले. आपली फसवणूक झाल्याचे कळतात काही डबेवाल्यांनी 4 फेब्रुवारी 2020 रोजी घाटकोपर पोलीस ठाण्यात सुभाष तळेकर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी अखेर सुभाष तळेकर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सुभाष तळेकर याच्या व्यतिरिक्त डबेवाला असोसिएशनचे माजी सेक्रेटरी विठ्ठल सावंत, सदस्य दशरथ केदारे, साई इंटरप्राईजेसचे राकेश प्रसाद आणि भावेश दोषी यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला असून पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.
'तळेकरांना अटक झाल्याने आनंद'तळेकर यांना अटक झाल्याचा खूप आनंद आहे. तळेकर यांनी आम्हा डब्बेवाल्यांना फसवलं आहे. मोफत गाड्या देणार देणार म्हणून फॉम भरून घेतले होते. मात्र त्यांनी गाड्या दिल्या नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात घाटकोपर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.गोरगरीब डब्बेवाल्यांना त्यांनी फसवले आहे. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असे तक्रारदार सचिन गावडे यांनी सांगितले.
कठोर शिक्षा झाली पाहिजे."या बोगस व खोट्या तळेकराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. अश्या खोट्या लोकांच्या लुबाडू वृत्तीमुळे डबेवाल्यांची प्रतिमा मलीन होत आहे. अशा लोकांविरोधात शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. रेडिओ सिटीच्या माध्यमातून २१ लाखाचा निधी डबेवाल्यांच्या नावाने गोळा केला व संपूर्ण निधी बळकावला. आंतरराष्ट्रीय स्तरावर डबेवाल्यांची ख्याती आहे. अनेक कंपन्या, शाळा, महाविद्यालयात डबेवाल्यांच्या कार्यप्रणालीची दखल घेतली जाते याचाही फायदा तळेकर यांनी घेतला.स्वतः डबेवाल्यांचे अध्यक्ष असल्याचे सांगत लेक्चर, जाहीराती व अनेक कार्यक्रम करून निधी मिळवला. "या बोगस व खोट्या तळेकराला कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे डबेवाले संघटनेचे उल्हास मुके यांनी सांगितले.
फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न4 फेब्रुवारी 2020 ला तक्रार नोंदवण्यात आली. तपास सुरू केला यात एकूण 6 लाख 578 रुपयांची फसवणूक झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यावरून 5 जानेवारी 2021 ला पुणे जिल्ह्यातील त्यांच्या घरून घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हामध्ये त्यांचे ४ सहकारी विठ्ठल सावंत, माजी सचिव, दशरथ केदारे, राकेश प्रसाद आणि भावेश जोशी हे दोषी आढळले असून त्यांना लवकरच अटक करू, अशी माहिती तपास अधिकारी समाधान चव्हाण यांनी दिली.