मुंबई - आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ७ जागांसाठी विदर्भात मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावरून ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वॉर रुमने जवळपास ५० हून अधिक तक्रारी ई-मेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.
मतदाना वेळी ईव्हीएम मशिनचा वेग मंद असल्याने काही ठिकाणी १ मतदान करण्यासाठी चार-चार मिनिटे लागत होती. काही ठिकाणी मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तर काही मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याच्या ५० हून अधिक तक्रारी काँग्रेसच्या वॉर रुमकडे आल्या आहेत. सर्वात जास्त तक्रारी या नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ मतदारसंघातून आल्या आहेत.
या तक्रारी मुख्य निवडणूक आयुक्त, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित शासकीय यंत्रणांना १०० हून अधिक फोन करुन या तक्रारींची माहिती देण्यात आली आहे.