मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार की, जयंत पाटील यावरून विधानभवनापासून ते राज्यपालांपर्यंत एका नव्या पेचाची सुरुवात झाली आहे. काल (सोमवार) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले विधानमंडळ गटनेते कोण आहेत, यासाठी त्यांच्या नावांची एक यादी आपल्या सर्व आमदारांच्या सहीसह विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांना सोपवली आहे. भागवत यांनीही यादी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात पाठवली. मात्र, यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयावर अंतिम निर्णय घेऊ शकणार नसल्याने त्यावर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काय निर्णय घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानमंडळ गटनेते हे अजित पवार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटनेते पदावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या सर्व 162 आमदारांच्या सह्यांचे निवेदन तयार करून त्यावर आपल्या पक्षांचे विधानमंडळ गटनेते कोण आहे, त्याची माहिती देत सर्वस्वी अधिकार आपण त्यांना देत असल्याचे नमूद केले आहे. त्याची एक प्रत काल (सोमवार) विधानमंडळ सचिवांना देण्यात आली असून त्यानंतर विधानमंडळ सचिव आणि विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात राष्ट्रवादीचे गटनेते कोण यावरून काही मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने दोनच दिवसांपूर्वी ठराव करून गटनेते म्हणून अजित पवार यांचे सर्वाधिकार आम्ही काढून घेत ते अधिकार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देत असल्याचे जाहीर केले होते.
त्यासाठीची माहिती ही जयंत पाटील यांनी राज्यपालांना कालच दिली होती. त्यासोबत काँग्रेस आणि शिवसेनेने आपले नेते कोण आहेत, याची माहितीही दिली होती. तरीही भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हे अजित पवार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेते पदावर राज्यपाल काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.