मुंबई - राज्यातील प्रमुख जिल्ह्यातील घडामोडींचा थोडक्यात आढावा.
- अमरावती - जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांनुसार, आता कोरोनाविषयी साशंकता वाटणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाचे वेळेवरच निदान व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. याच अनुसरून चांदूर रेल्वे येथील कोविड सेंटरवर दर आठवड्यात मंगळवारी आणि शुक्रवारी स्वॅब घेण्यात येणार आहे. आतापर्यंत चांदूर रेल्वे येथे शासकीय अधिकारी, कर्मचारी व काही नागरिक अशा एकूण 115 लोकांचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले.
- नाशिक - जिल्ह्यात मागील 24 तासांत कोरोनाचे 636 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक 474 रुग्ण नाशिक शहरातील आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 528 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. लढाऊ विमानाची बांधणी आणि दुरुस्ती करणाऱ्या ओझरच्या एचएएल कारखान्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथे आतापर्यंत 204 बाधितांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील कामगारांना 15 दिवसांची सुटी द्यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. मागील 15 दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी कोरोनाची अँटीजेन टेस्ट सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 707 रुग्ण मिळून आले आहेत. तर आतापर्यंत 547 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, एकूण 12 हजार 812 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 4 हजार 338 जण उपचार घेत आहेत.
- नंदुरबार - जिल्ह्यात बुधवारी 49 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. यात 9 बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील 75 वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 40 झाली आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 767 वर पोहोचली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मृत्यू आणि रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
- बीड - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एक हजारावर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 510 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, गेवराई हे तालुके हॉटस्पॉट बनले आहेत. एकंदरीत जिल्ह्यात रुग्ण वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वाती रुग्णालय, लोखंडी सावरगाव आणि बीड जिल्हा रुग्णालय या तिन्ही ठिकाणी मिळून 800 पेक्षा अधिक खाटांची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यावर आता जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. गेवराई तालुक्यात 1 हजार 310 व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी 28 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.