मुंबई - महापालिका व पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा कोस्टल रोड हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या कोस्टल रोडच्या कामासाठी काही ठिकाणी सध्या काम सुरू आहे. या कामामुळे पाणी साचल्यास त्याची तक्रार करता यावी, म्हणून तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच पालिकेच्या 1916 या क्रमांकावरही संपर्क साधता येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील 'शामलदास गांधी मार्ग' प्रिन्सेस स्ट्रीट ते 'राजीव गांधी सागरी सेतू' वरळी सी लिंक यांना जोडणारा ९.९८ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड हा महापालिकेचा महत्त्वाचा व देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम यापूर्वीच सुरु झाले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी कंत्राटदारांकडून घेतली जात आहे. तसेच महापालिकेच्या किनारी रस्ता खात्याद्वारे याबाबत पर्यवेक्षणही नियमितपणे केले जात आहे. मात्र, अपवादात्मक प्रसंगी या प्रकल्प कामांमुळे पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास तत्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाच्या सुचनेनुसार संबंधित कंत्राटदारांद्वारे तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.
![कोस्टल रोडमुळे पाणी साचल्यास तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-03-costal-road-7205149_04072020150340_0407f_1593855220_409.jpg)
प्रियदर्शिनी उद्यान, अमरसन्स उद्यान व वरळी डेअरी या तीन ठिकाणांच्या जवळ हे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडलेले आहेत. 'कोस्टल रोड'चे बांधकाम सुरु असलेल्या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी संबंधीत नियंत्रण कक्षाकडे किंवा पालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या दूरध्वनीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेच्या सागरी किनारा रस्त्याचे प्रभारी प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी केले आहे.
नियंत्रण कक्ष क्रमांक -
'कोस्टल रोड' च्या 'पॅकेज १' करिता अमरसन्स उद्यानाजवळच्या तक्रारीसाठी ०२२–२३६१०२२१, राकेश सिंग सिसोदीया या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी ९१६७०६११०६ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल. 'पॅकेज २' साठी वरळी डेअरी समोर उभारण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२–२४९००३५९ असा आहे. तसेच अविक पांजा व आजाद सिंग या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी अनुक्रमे ८६५७५००९०० व ९८१९०२६५९५ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल. तर 'पॅकेज ४' करिता प्रियदर्शिनी उद्यानाजवळ असणाऱ्या एम.एस.आर.डी.सी. च्या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रणात कक्षाचा आपत्कालीन क्रमांक ०२२ - २३६२९४१० असा आहे. तसेच संदिप सिंग व उत्पल दत्ता या नियंत्रण कक्षाच्या संपर्क अधिकाऱ्यांशी ९९५८८९९५०१ व ९९५८७९३०१२ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येऊ शकेल असे पालिकेने कळविले आहे.