मुंबई - राज्याची राजधानी मुंबईमध्ये 5 ऑगस्टला मुसळधार पाऊस झाला आणि कधी नव्हे ते चर्चगेट परिसरापासून अगदी गिरगाव चौपाटीही पाण्याखाली गेली. 26 जुलै 2005च्या प्रलयातही दक्षिण मुंबईत अशी परिस्थिती उद्धभवली नव्हती. त्यामुळे आता तमाम मुंबईकरांना एक प्रश्न पडला आहे, तो म्हणजे चर्चगेट आणि गिरगाव चौपाटी पाण्याखाली गेलीच कशी? तर याचे उत्तर आता पर्यावरण तज्ज्ञ आणि स्थापत्यशास्त्रज्ञांनी दिले आहे. ते उत्तर म्हणजे कोस्टल रोडमुळेच दक्षिण मुंबईची तुंबई झाली. इतकेच नव्हे तर भविष्यात गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटीला आणखी धोका वाढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 'से नो टू कोस्टल रोड' म्हणत हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा पर्यावरण तज्ञांनी उचलून धरली आहे.
मुंबई हे बेट असून मुंबईत मोठ्या प्रमाणात सखल भाग आहे, असे असतानाही मुंबईत गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश केला जात आहे. समुद्रातही मोठ्या प्रमाणावर भराव टाकत समुद्र किनारे नष्ट केले जात आहेत. समुद्रात भराव टाकणे हे मुंबईसाठी धोकादायक असल्याचे पर्यावरण तज्ञ वांद्रे-वरळी सी लिंक प्रकल्प हाती घेतला तेव्हापासून म्हणजेच 15 वर्षांपासून सांगत आहेत. तरीही हा प्रकल्प झाला. मात्र, हा प्रकल्प पिलरवर उभारण्यात आल्याने आणि भराव कमी केल्याने त्याचा तितकासा दुष्परिणाम दिसत नाही. पण आता कोस्टल रोडमुळे मात्र मुंबईची पुरती दैना होणार असल्याचे पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञ सांगत आहेत.
याकडे दुर्लक्ष करत मुंबई महानगरपालिका हा प्रकल्प मार्गी लावत आहे. प्रकल्पाचे काही टक्केच काम झाले आहे. अद्याप फक्त हाजीअली परिसरातच भराव टाकण्यात आले आहेत असे असतानाही दक्षिण मुंबई आणि गिरगाव चौपाटी पाण्याखाली गेले. वनशक्तिचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी हा धोक्याचा इशारा असल्याचे स्पष्ट केले. समुद्रात भरणी केल्यास पुराची स्थिती निर्माण होते हे साधे समीकरण आहे. मात्र, याकडे साफ काणाडोळा करत आपण कोस्टल रोडच्या नावाखाली समुद्रात भराव टाकत आहोत. त्यामुळे साहजिकच पावसाचे पाणी समुद्रात जाण्याला अडथळे निर्माण होत आहेत. भरतीच्या वेळेत पाणी बाहेर येणार, हेच गेल्या 5 ऑगस्टला दिसून आले. गिरगाव चौपाटी पाण्याखाली गेल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यामुळे आता तरी शासनाने याकडे लक्ष देत हा प्रकल्प रद्द करावा. रद्द करणे शक्य नसेल तर भराव न टाकता पिलरवर रोड उभा करावा, अशी मागणी स्टॅलिन यांनी केली आहे.
प्रसिद्ध आर्किटेक्ट नितीन किलावाला यांचेही हेच सांगणे आहे. 5 ऑगस्टला कधी नव्हे ते मंत्रालय-फोर्ट परिसरात पाणी साचले ते कोस्टल रोडमुळेच. गिरगाव चौपाटीही याच कारणाने पाण्याखाली गेल्याचा आरोप किलावाला यांनी केला आहे. कोस्टल रोडला आम्ही सुरवातीपासून विरोध करत आहोत त्याचे हे एकच कारण आहे. या प्रकल्पामुळे मुंबईत पूरपरिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशारा दिला होता. पण याकडे दुर्लक्ष करत प्रकल्प रेटला जात आहे. आता कुठे हा प्रकल्प सुरू झाला नाही तोच 5 ऑगस्टला त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईची पूर्ण वाताहात होईल. गिरगाव चौपाटीचा धोका आणखी वाढेलच, पण पुढे जुहू चौपाटी ही शिल्लक उरेल की नाही हा प्रश्नच आहे, असे किलावाला म्हणाले.
याविषयी पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता त्यांनी मात्र हा आरोप नाकारला आहे. हाजीअली जवळ भराव टाकला असताना चर्चगेटमध्ये पाणी कसे भरेल? असे म्हणत त्यांनी हा आरोप नाकारला आहे. 5 ऑगस्टला 46 वर्षांतील विक्रमी पाऊस पडला. त्यामुळे फोर्ट परिसरात पाणी साचले तर गिरगाव चौपाटीही पाण्याखाली गेली असे काकाणी म्हणाले.