मुंबई - कांदळवनांची होणारी कत्तल, त्यावर डेब्रिज टाकून केली जाणारी हानी तत्काळ रोखा. तसेच, कांदळवनांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा - जानेवारी 2021मध्ये तब्बल 95 अल्पवयीन मुलींचे अपहरण
पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने कांदळवनांचे असलेले महत्व लोकांना समजून सांगण्यासाठी प्रबोधन करण्याबरोबरच कांदळवनांच्या जागी संरक्षक भिंती किंवा कुंपण बांधणे, सीसीटीव्ही लावणे आदी उपाययोजना करण्यात याव्या. कांदळवनांवर डेब्रिज टाकणारी वाहने आणि संबंधित विकासकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया करण्यात याव्या, अशा सूचनाही मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.
डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई
मागील आठवड्यात कांदळवनांवर डेब्रिज टाकणाऱ्या काही वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला गती देण्यात यावी, संबंधित वाहने ताब्यात घेण्यात यावीत, तसेच फक्त वाहनचालकांवर कारवाई न करता डेब्रिजचा स्त्रोत शोधून संबंधित बांधकाम विकासकांवरही कारवाई केली जाणार आहे.
गुन्हा दाखल होणार
कांदळवनांचे नुकसान करणाऱ्यांवर वन आणि पर्यावरण संवर्धनविषयक नियमांनुसार एफआयआर दाखल केली जाणार आहे. तसेच, हे प्रकरण न्यायालयात गेल्यास तेथेही योग्य बाजू मांडून पाठपुरावा करावा, असे निर्देश मंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी, उपवनसंरक्षक नीनू सोमराज, पोलीस उपायुक्त चैतन्या एस. आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - पोलीस असल्याची थाप मारत हॉटेलमधून 12 कोटींची चोरी, आठ जण ताब्यात