मुंबई - सायन धारावी येथील नाल्यावरील अतिक्रमण हटवताना पोलिसांसमोरच पालिका अधिकाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली. मात्र, यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना मारहाण करणारे त्या ठिकाणाहून पसार झाले आहेत. मात्र, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळत आहे.
सायन धारावी येथील पालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्या हद्दीत मुख्याध्यापक नाला आहे. या नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामात अडथळा ठरणारी ३४ अतिक्रमणे हटवण्याचे काम मंगळवारी सकाळपासून सुरू होते. संध्याकाळपर्यंत २० अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली असून उर्वरित बांधकामे बुधवारी हटवण्यात येणार आहेत.
मंगळवारी दिवसभर पोलीस संरक्षणात सुरू असलेल्या या धडक कारवाईदरम्यान येथील काही व्यक्तींनी दुय्यम अभियंता अमित पाटील यांना मारहाण केली, तर अभियंता रोहित आफळे व कामगार निलेश पाटील यांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली. अतिक्रमणासाठी मागवण्यात आलेल्या पोलिसांच्या समोरच पालिकेच्या अभियंत्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर अमित पाटील यांना सायन येथील महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाई सुरू असताना अभियंत्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अभियंत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांचा फौजफाटा असतानाही मारहाण करणारे पोलिसांसमोरून पळून गेले. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले नाही, अशी माहिती अभियंत्यांकडून देण्यात आली आहे.