मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९-२० साठी सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या २०१९ च्या नागरी सेवा परीक्षांचा आज निकाल जाहीर झाला असून यंदाही राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेल्या वरचष्मा राहिल्याचे दिसून आले आहे.
परीक्षेत प्रदीप सिंह या उमेदवाराने प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातून नेहा प्रकाश भोसले हिने १५ वा क्रमांक पटकावला. तर मूळच्या बीडच्या पण पुण्यातून तयारी केलेल्या मंदार पत्की याने २२ वा तर आशुतोष कुलकर्णी याने ४४ वा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इंजिनीअर झाल्यानंतर काही कारणाने दृष्टी गमावलेल्या जयंत मंकले याने १४३ वा क्रमांक पटकावत आपले स्वप्न साकारले आहे.
युपीएससीच्या परीक्षेत यंदा ६० हून अधिक मराठी उमेदवारांनी या परीक्षेत यश मिळवले असून यंदाही इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे राज्यातून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी हे इंजिनीअरिंगची पार्श्वभूमी असलेले असून त्यासोबतच यामध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांपेक्षा राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. २०२०मधील यूपीएससी परीक्षा ३१ मे रोजी पार पडणार होती. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
युपीएससीकडून घेण्यात आलेल्या सप्टेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या फेब्रुवारी आणि जुलैमध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाने आज आपल्या संकेतस्थळावर वेबसाइटवर जाहीर केली आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवांमधील गट 'अ' आणि गट 'ब' मधील सेवांमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.
युपीएससीच्या परीक्षेत जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी राहिले. या परीक्षेद्वारे एकूण ८२९ उमेदवारांना नियुक्ती देण्याची शिफारस यूपीएससीने केली आहे. ११ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. या वेळी म्हणजेच २०१९ मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कोट्यातून ७८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी काही मराठी नावे अशी आहेत....
रँक आणि नाव
१५ नेहा भोसले
२२ मंदार पत्की
४४ आशुतोष कुलकर्णी
६३ योगेश पाटील
९१ विशाल नरवडे
१०९ राहुल चव्हाण
१३७ नेहा देसाई
१३५ कुलदीप जंगम
१४३ जयंत मंकले
१५१ अभयसिंह देशमुख
२०४ सागर मिसाळ
२१० माधव गित्ते
२११ कुणाल चव्हाण
२१३ सचिन हिरेमठ
२१४ सुमित महाजन
२२६ अविनाश शिंदे
२३० शंकर गिरी
२३१ श्रीकांत खांडेकर
२४९ योगेश कापसे
४३३ अविनाश जाधववर
४३९ परमानंद दराडे
४९७ सुब्रमण्य केळकर
६५१ अशित कांबळे
७७३ अश्विन घोलपकर
७८९ अजिंक्य विद्यागर