मुंबई - तब्बल 30 तासाहून अधिक वेळ येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ईडीकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे राणा कपूर देत नसल्याने ईडीने त्यांना अटक करून न्यायालायत हजर केले. ईडी न्यायालयाने राणा कपूर यांची रवानगी 11 मार्चपर्यंत ईडी कोठडीत केली आहे. याबरोबरच राणा कपूर यांच्या ३ मुली राखी कपूर टंडन, रश्मी कपूर, रोशनी कपूर यांच्यासह पत्नी बिंदू कपूर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानी ईडीने छापे मारले आहेत. बिंदू कपूर या सध्याच्या घडीला 18 कंपन्यांच्या संचालक पदावर असून, रोशनी कपूर या 23 तर रश्मी कपूर या 20 कंपनीवर संचालक म्हणून आहेत. या प्रकरणात मनी लाँडरिंग मोठ्या प्रमाणावर केली असल्याचा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला.
राणा कपूर यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान काही प्रश्न विचारले, ज्याची योग्य उत्तर देण्यात राणा कपूर यांनी टाळाटाळ केली आहे. या प्रश्नात राणा कपूर यांना विचारण्यात आले की, येस बँकेसोबत तुम्ही कधी पासून कार्यरत आहात? यावर मी स्वत: येस बॅंकेचा फाऊंडर सदस्य आहे. २००४ साली मी आणि माझा भाऊ अशोक कपूर आम्ही दोघांनी मिळून ही बँक सुरू केली असे उत्तर राणा कपूर यांनी दिले. येस बॅंकेच्या कर्ज प्रक्रियेत तुमचा किती सहभाग असतो? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, विविध कामांकरीता बँकेत मी विविध पातळींवर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना त्याबाबत अधिकार दिले गेले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - ईडीकडून येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक, 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी
हेही वाचा - 'पॉईंट्समन' नव्हे तर 'पॉईंट्सवूमन'; 'त्या' तिघी करतात रोज रेल्वेच्या शँटिंग
डीएचएफएल या कंपनीला दिलेल्या कर्जाची रक्कम किती होती? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारला असता, याबाबत कर्जाची रक्कम किती होती हे मला निश्चित सांगता येणार नाही. पण एप्रिल ते जुलै २०१८ दरम्यान कर्जाची मूळ रक्कम आणि व्याजासहित एकूण ३ हजार ७०० कोटी रुपये डीएचएफल या कंपनीकडे थकीत आहेत, हे मला माहिती असल्याचे कपूर म्हणाले.
डीएचएफएल या कंपनीला नियमबाह्य कर्ज दिले गेले. थेट 'डिलींग' केली गेली त्यात तुम्ही होता का? यावर नाही असे उत्तर कपूर यांनी दिले. बॅकेंचे कर्ज व्यवस्थापक आणि अधिकारी ते पाहतात. त्यामुळे त्यात माझा काहीही संबंध नसल्याचे ते म्हणाले. कपिल आणि धीरज वाधवानला तुम्ही ओळखता का? जे डीएचएफलचे डायरेक्टर आहेत ते? यावर हो यांना मी ओळखतो.
येस बँकेकडून आर के डब्लू डेव्हलपर्सला ७५० कोटींचे कर्ज दिले होते. ज्यात नियंमांचे पालन करण्यात आले होते का? आर के डब्लू डेव्हलपर्सची संपत्तीच नव्हती? मग त्या कंपनीला तुम्ही कर्ज कसे दिले? या प्रश्नावर गोंधळलेल्या राणा कपूर यांनी याबाबत मला माहिती नसून बँकेचे अधिकारी अधिक सांगू शकतील असे म्हटले. कर्ज मी नाही दिले, बँकेने दिले असल्याचे ते म्हणाले.