मुंबई - राज्यात सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या विविध सेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विविध प्रकाराचे कार्यक्रम आणि त्यासाठीचा आढावा घेण्याची मोहिम जोरात सुरू आहे. मुंबईत कालपासून (29 ऑगस्ट) यासाठी बैठका सुरू असून यात राज्यातील विविध सेल आणि त्यांच्या प्रमुखांना पक्षबांधणीसाठी कार्यक्रम दिले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यातील महिला, शेतमजूर आणि वंचित घटकातील नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आदी विषयांवर राष्ट्रवादीच्या सेल प्रमुखांना काम करण्यासाठीचा कार्यक्रम दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कालपासून सुरू असलेल्या फ्रंटल व सेलच्या राज्यप्रमुखांच्या मॅरेथॉन बैठकीचा तिसरा टप्पा आज (30 ऑगस्ट) मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडला. अल्पसंख्याक सेल, लिगल सेल, वक्ता प्रशिक्षण सेल, ग्रंथालय सेल, भटक्या विमुक्त जाती व जमाती सेल, सहकार, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस या संघटनांच्या बैठका आज झाल्या. राष्ट्रवादी अभिप्राय अभियानाची माहिती व संघटन बांधणीसाठी केलेल्या विविध उपक्रमांचा आढावादेखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला.
यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. आशिष देशमुख, वक्ता प्रशिक्षण सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सुलक्षणा सलगर यांनी या बैठकांमध्ये सादरीकरण केले. याशिवाय मुंबई प्रदेश कार्यालयात फ्रंटल व सेल संघटनांच्या राज्यप्रमुखांशी सुरू असलेल्या बैठकांच्या शेवटच्या टप्प्यात ग्रंथालय सेल, भटक्या विमुक्त जाती व जमाती सेल, सहकार सेल या संघटनांच्या बैठका झाल्या. या बैठकांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थितीत राहून सेलकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांचा आढावा प्रदेशाध्यक्षांसह यावेळी घेत विविध घटकातील नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कार्यक्रम सांगितला.
राष्ट्रवादीच्या ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, भटक्या विमुक्त जाती व जमाती सेलचे हिरालाल राठोड, सहकार सेलचे भारद्वाज पगारे या सेल प्रदेशाध्यक्षांनी सादरीकरण केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बसवराज पाटील, नसीम सिद्धीकी, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे हे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - राज्य सरकार आणि डीएमआरसीच्या परवानगीनंतरच मेट्रो 1 ट्रॅकवर; एमएमओपीएलची माहिती