मुंबई Uday Pawar Laundry Business : सध्या आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित 'बारावी फेल' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर तर श्रद्धा आणि मनोजच्या लव्ह स्टोरीवर आधारित मीम आणि कोट्सवर नेटकरींच्या लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. बारावीत नापास झालेल्या मनोज शर्मा यांनी न खचता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एक आयपीएस बनवण्याचं स्वप्न पूर्ण केलं. हेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. मात्र, आपल्याकडं असे अनेक तरुण आहेत, ज्यांना परिस्थितीसमोर दोन पावलं मागं येणं भाग असतं. मुंबईत असाच एक तरुण आहे ज्याचं नाव आहे उदय पवार.
कोण आहे उदय पवार : आता या बातमीला आम्ही जे शीर्षक दिल आहे ते का दिलं? हे जरा सविस्तर समजून घ्या. उदय पवार म्हणजे मुंबईतल्या जिजामाता झोपडपट्टीत जन्माला आलेला एक सामान्य गरीब कुटुंबातील मुलगा. घरी आई वडील आणि भावंड असं उदय पवार यांचं कुटुंब. अकरावीपर्यंत उदय पवारच व्यवस्थित शिक्षण झालं. मात्र, पुढच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यानं आणि घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यानं उदय पवार यांना परिस्थिती समोर दोन पावलं मागे यावं लागलं. घर चालवण्याची जबाबदारी उदय यांच्यावर आली. लहान वयातच कुटुंबाची आलेली जबाबदारी मोठ्या हिमतीने उदय यांनी स्वीकारली आणि आपल्या झोपडपट्टीतच छोट्या इस्त्रीच्या दुकानाला सुरुवात केली.
इस्त्रीचा व्यवसाय केला सुरू : उदय पवार सांगतात की, घर चालवण्यासाठी मी कॅलेंडर विकले, मण्यांच्या माळा विकल्या, अगदी सोरट देखील विकले. पण, त्यात काही यश आलं नाही. अखेर मी जिथे राहत होतो तिथेच एक छोटा टेबल टाकून इस्त्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात नवीन असल्याने इस्त्री कशी करतात? कपड्याची घडी कशी घालतात इथपासून माझी सुरुवात होती. या तर बेसिक गोष्टी होत्या. खरी अडचण तर कोणाचे कपडे कुठले? त्यांनी किती कपडे दिले आहेत? या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन असल्याने त्या माझ्या लक्षात राहत नव्हत्या. मी त्यातून खूप काही शिकत होतो.
एका टेबलपासून सुरू केला प्रवास : असं म्हणतात गरज ही शोधाची जननी असते. कपडे लक्षात न राहणे ही उदय पवार यांची अडचण होती. कोणाचे कपडे कुठले? कुणी किती कपडे दिले आहेत हे लक्षात राहत नसल्यानं या प्रॉब्लेमवर उपाय म्हणून उदय पवार यांनी छोट्या बॅग खरेदी केल्या आणि त्या त्यांच्या ग्राहकांना देण्यास सुरुवात केली. जेणेकरून त्या बॅगेतून संबंधित ग्राहकाचे कपडे येतील आणि त्याच बॅगेत मोजून ते व्यवस्थित स्वच्छ धुऊन पुन्हा ठेवता येतील. यातून कपडे हरवणे, कपड्यांची अदलाबदली होणे असे प्रकार बंद झाले. या एका छोट्या कृतीचा उदय पवार यांच्या व्यवसायावर देखील सकारात्मक परिणाम झाला. एका टेबलपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे सहा टेबलचा व्यवसाय झाला.
व्यवसायात केला 'हा' बदल : लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने आता उदय पवार यांनी देखील आपल्या व्यवसायात काही बदल करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांना अधिक उत्तम सेवा कशी देता येईल या दृष्टीने आपल्या व्यवसायात काही बदल केले. त्यांनी वर्तमानपत्राची शाई कपड्यांना लागत असल्यानं त्यांनी ते बंद केलं आणि स्वतःचे चांगल्या प्रतीचे पेपर प्रिंट करून घेतले. त्यावर काही सामाजिक संदेश लिहिण्यास सुरुवात केली. घड्याळाच्या काट्यावर पळणारं शहर म्हणजे मुंबई, अशी मुंबईची ओळख आहे. मुंबईकरांना कधीच वेळ नसतो असं इतर शहरातील लोक उपरोधितपणे बोलतात. मुंबईकरांना वेळ नसणं हीच बाब लक्षात घेऊन उदय पवार यांनी आपल्या व्यवसायात आणखी एक बदल केला तो म्हणजे 'फ्री पिकप ड्रॉप सर्विस'. म्हणजे तुम्हाला तुमचे कपडे धुण्यासाठी त्या दुकानापर्यंत जाण्याची गरज नाही. फक्त एक फोन करायचा आणि डिलिव्हरी बॉय तुमच्या दारात हजर.
व्यवसायातून मिळाला अनेकांना रोजगार : आपल्या व्यवसायात केलेल्या या छोट्या-छोट्या बदलांचा उदय पवार यांना मोठा फायदा झाला. त्यांची ग्राहक संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यात त्यांचे लॉन्ड्रीचे दर देखील सामान्य लॉन्ड्री प्रमाणेच असल्याने सर्वसामान्य माणूस देखील आपले कपडे घेऊन उदय पवार यांच्या लॉन्ड्रीकडे जाऊ लागला. आज घडीला उदय पवार यांच्याकडे कपडे धुण्याच्या स्वतःच्या आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त मशीन असून, मुंबईमध्ये दोन शाखा आहेत. या व्यवसायातून त्यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. उदय पवार सांगतात की, माझ्या मुंबईत सध्या दोन शाखा आहेत. मात्र, लवकरच यांची संख्या वाढून 24 शाखा मुंबईत असतील. त्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, माझ्याप्रमाणेच अनेक होतकरू तरुण आपल्याकडे आहेत. त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी मी या शाखा वाढवत आहे. या तरुणांना लागणारे प्रशिक्षण देखील आम्ही देणार आहोत.
हेही वाचा -