मुंबई - उपनगर जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या ख्रिस्ती कर्मचाऱ्यांसाठी १९ एप्रिल ऐवजी २० एप्रिलला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. १९ एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने ख्रिस्ती कर्मचाऱ्यांना या दिवशी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहण्यासाठी सूट देण्यात आली आहे.
उपनगर जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १८ व १९ एप्रिलला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यात बोरीवली, दहिसर, कांदिवली, चारकोप, मालाड(पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व), दिंडोशी, वर्सोवा या विधानसभा मतदारसंघात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मात्र, १९ एप्रिलला गुड फ्रायडे असून या दिवसाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन ख्रिस्ती कर्मचाऱ्यांना या दिवशी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना शुक्रवारी (२० एप्रिल) प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तरी ख्रिस्ती कर्मचाऱ्यांनी संबंधित निवडणुक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रशिक्षणासाठी उपस्थित रहावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी संबंधितांना दिले आहेत.