मुंबई - विक्रोळी 156 मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातील एका अधिकार्याचा सोमवारी दुपारी 1 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात मृत्यू झाला. राहुल जगताप, असे मृत्यू झालेल्या अधिकार्याचे नाव आहे.
हेही वाचा - जास्त व्याजासाठी मुंबई महापालिकेची खासगी बँकांकडे धाव
बेलापूरला राहणारे राहुल जगताप हे सरकारच्या इआरटीएल विभागात कार्यरत होते, त्यांची झोनल ऑफिसर म्हणून विक्रोळी 156 मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात नियुक्ती झाली होती. राहुल जगताप हे सोमवारी नेहमीप्रमाणे निवडणूक कामासाठी कार्यालयात हजर होते. ते सकाळपासून इव्हीएम मशीनचे काम करत होते. मात्र, दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांच्या पाठीत अचानक दुखायला लागले. निवडणुकीच्या कामात पाठ दुखीचा त्रास अधिक नको म्हणून विक्रोळी 156 चे निवडणूक अधिकारी अजित नैराळे यांनी जगताप यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. तसेच त्यांच्यासोबत एका व्यक्तीला पाठवत त्यांना विक्रोळीतील टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका रूग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. तेथे त्यांची तपासणी सुरू असताना दुपारी 1 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. परंतु, यातच त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - शिवसेनेच्या गीता भंडारी होणार नगरसेविका; महापालिकेतील शिवसेनेच्या संख्याबळात वाढ