मुंबई - साधरणतः निवडणुकांच्या आधी राजकीय पक्षांकडून स्टार प्रचारकांची यादी सादर करण्यात येते. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपली यादी सादर केली आहे. शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना वगळून एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक राहुल लोंढे यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी या युतीनेही महाराष्ट्रात सर्व जागा लढवण्याची घोषणा केली आहे. जवळजवळ २ दशके बसपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले विलास गरुडही स्टार प्रचारकाच्या यादीतून गायब झाले आहेत. तर भाजपमध्ये उलट चित्र आहे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा लोकसभा उमेदवारीच्या पत्ता कट केला असला तरी त्यांचे नाव स्टार प्रचारकाच्या यादीत आहे.
लोकसभेसाठी शिवसेनेनेच्या स्टार प्रचारकाच्या यादीत केवळ २ राज्यमंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह २० जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, आदेश बांदेकर, सुर्यकांत महाडिक, विनोद घोसाळकर, निलम गोऱ्हे, लक्ष्मण वडले, नितीन बानगुडे पाटील, वरून सरदेसाई, राहूल लोंढे यांचा समावेश आहे. तर केवळ २ राज्यमंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील आणि विजय शिवतारे यांचा समावेश आहे.
बहुजन समाज पार्टीत स्टार प्रचारकांमध्ये अध्यक्ष मायावती यांच्यासह त्यांचे भाचे आकाश आनंद, खासदार सतीशचंद्र मिश्रा, प्रदेशअध्यक्ष सुरेश साखरे, प्रमोद रैना, संदीप ताजने, कृष्णाजी बेले, संजीव सदाफुले, रवींद्र गवई यांचा समावेश करण्यात आला असून माजी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांचे नाव स्टार प्रचारकाच्या यादीतून वगळण्यात आले आहे.