मुंबई: महाविकास आघाडीची सत्ता असताना मुंबई महापालिकेकडून १२ हजार २४ कोटी रुपयांची विविध कामे करण्यात आली आहेत. त्यात अनियमितता असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले होते. या विकास कामांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.
मुंबई महापालिकेतील अनियमिततेची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उच्च अधिकारी इतर वरिष्ठ अधिकारी करणार आहेत. महानगरपालिकेने नोव्हेंबर 2019 ते जून 2022 या कालावधीत अनेक कामे केली आहेत. विशेषत: कोविड-19 च्या महामारीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने यापूर्वी केला आहे.
आशिष शेलार यांनी यापूर्वी काय केले आहेत आरोप - मुंबई महानगरपालिकेच्या नऊ विभागांमधील सुमारे 76 कामांमध्ये 12000 कोटींचा घोटाळा झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असल्याचे शेलार यांनी म्हटले होते. मुंबई महानगरपालिकेतील अनेक कामे ही टेंडरशिवाय झाल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला. टेंडर कशा पद्धतीने बदलावे, कसा भ्रष्टाचार करावा, याचे पुस्तकच आदित्य ठाकरे यांनी लिहावे असा टोलाही त्यांनी लगावला होता. मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठलीही निविदा न काढता, कंत्राटदारांसोबत करार न करता कामे केल्याचा आरोपही शेलार यांनी यापूर्वी केला. प्रकाराची कसून चौकशी व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी, अशी शेलार यांनी मागणी केली होती.
मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका- मुंबई महापालिकेवर आजवर शिवसेनेची (ठाकरे गट) सत्ता राहिलेली आहे. सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासक नियुक्त आहेत. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. आगामी निवडणुकांमध्ये मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर असेल, अशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे. मुंबईतील भाजप आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून कोविड-19 संबंधित विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. कॅगने लेखापरीक्षण अहवालात मुंबई महापालिकेच्या विविध कामांबाबत प्रश्न उपस्थित केले होता. त्याबाबत चौकशी करावा, अशी मागणीही भाजप आमदार साटम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हेही वाचा-