मुंबई Eknath Shinde Maharashtra Tour : राज्यातील महायुती सरकारनं केलेल्या कामांच्या बळावर मतं मागायची असून, लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 48 ची सुरुवात करण्यासाठी 'शिवसंकल्प' अभियान हाती घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 'शिवसंकल्प' अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
दोन टप्प्यांत होणार प्रचार मेळावे : गुरुवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन उपस्थित राहिले. या पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरुन संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रचार मेळावे दोन टप्प्यात पार पडणार आहेत. त्यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी यवतमाळ येथून सुरू होणार आहे. 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेनं पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होणार आहे.
महायुतीचेही प्रचार मेळावे होणार : दुसऱ्या टप्प्यात 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना सुरुवात होणार आहे. 25 जानेवारी रोजी शिर्डी इथं पहिला प्रचार मेळावा पार पडेल. तर या दुसऱ्या टप्प्यातील मेळाव्यांचा समारोप 30 जानेवारी रोजी हातकणंगले येथं होईल. या प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह शिंदे गटाच्या वतीनं कोल्हापूरात दोन दिवसीय विशेष महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर या 'शिवसंकल्प' अभियानाची सांगता होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार आहेत. त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील, असंही यावेळी शिंदेंनी सांगितलं.
अभियानासाठी मध्यवर्ती समिती : या शिवसंकल्प अभियानाची तयारी करण्यासाठी एक मध्यवर्ती समिती तयार करण्यात आली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं या प्रचार मेळाव्यांची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील लोकसभेच्या 48 जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना केलंय. तसंच शिवसंकल्प अभियानाप्रमाणेच महायुतीच्या एकत्रित सभाही राज्यभरात आयोजित करण्यात येतील. शिवसेनेची ताकद दाखवून देण्यासाठी शिवसंकल्प अभियान यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आलाय.
अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करा : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. हा क्षण कायम लक्षात राहावा यासाठी घराबाहेर भगवा झेंडा लावावा, गुढ्या उभाराव्यात, जागोजागी दीपोत्सव साजरा करण्यात यावा असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. राम मंदिराची उभारणी हे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यावधी रामभक्तांचं स्वप्न होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण करुन दाखवलंय. अयोध्येतील राममंदिर हा आपल्यासाठी आस्थेचा विषय आहे. हा क्षण कायम लक्षात रहावा यासाठी शक्य तिथं हा सोहळा एलईडी स्क्रिनच्या माध्यमातून लोकांना लाईव्ह दाखवण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, असंही यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय. तसंच आपापल्या भागातील मंदिरं, ग्रामदेवतांची मंदिरं इथं विद्युत रोषणाई करुन हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा अशा सूचना शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :