मुंबई - गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याबरोबरच त्यांनी भाजप नेत्यांना विशेषत: देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. त्यांनी 'ईडी' लावली तर मी 'सीडी' लावेन अशा शब्दात त्यांनी सूचक वक्तव्य केले. कोणी किती भूखंड घेतले? असे म्हणत आपण लवकरच पत्ते खोलणार असल्याचे खडसेंनी सांगितले.
प्रवेशानंतर बोलताना त्यांनी भाजपपेक्षा दुप्पट वेगाने राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करेन, असे सांगितले. माझ्या डोक्यावरील ओझे कमी झाल्यासारखे आज वाटत आहे. भाजपमध्ये अन्याय होत असल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश करावा, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असेही खडसे म्हणाले.
हेही वाचा - महसूल विभागाला मॅट न्यायालयाचा दणका; तहसीलदारांसह इतर १३ बदल्या केल्या रद्द
४० वर्षात महिलेला समोर ठेवून राजकारण कधी केले नाही, कोणाला समोर ठेवून राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही, असे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केले, तितकेच राष्ट्रवादीसाठी करणार आहे. भाजप ज्या वेगाने वाढवला, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवू, असा विश्वासही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचप्रमाणे मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे देखील एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.