दिल्ली - राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून जवळपास एक महिना झाला तरी अजून सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेच्या ताणलेल्या संबंधांमुळे सेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी असून सत्तास्थापनेसाठी अजूनही एकमत होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे.
हेही वाचा - रविवारी शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट; पुढील वाटचालीसंदर्भात करणार चर्चा
गायकवाड म्हणाले की, सत्तास्थापनेची रणनीती आखण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवावा लागेल. कोणत्या पक्षाला कोणती खाती द्यायची, मंत्रिमंडळाची रचना कशी असेल, हे सर्व मुलभूत मुद्दे ठरवावे लागतील. यासाठी तिन्ही पक्षांचे अध्यक्ष मान्यता देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. लवकरात लवकर हे होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सेना आणि काँग्रेसच्या विचारधारेत अंतर आहे. परंतु, सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल आणि त्याप्रमाणेच सरकार काम करेल. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी काम करायचे आहे, असेही गायकवाड म्हणाले.