मुंबई - हुतात्मा जवानांच्या कुटुंबातील मुलांचा 'केजी ते पीजी' पर्यंतचा शैक्षणिक खर्च सिद्धिविनायक न्यास करणार असल्याची घोषणा न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे. सिद्धिविनायक न्यास विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
देशाच्या सीमेवर महाराष्ट्रातील जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. त्यामुळे सीमेवर होणाऱ्या अनेक चकमकीत मराठी जवानांचा सहभाग असतो. या अटीतटीच्या प्रसंगी देशाचे रक्षण करताना अनेक मराठी जवानांना वीरगती येते. या हुतात्मा कुटुंबांच्या मुलांच्या डोक्यावर आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने वडिलकीचं छत्र धरले आहे. यापूर्वी सिद्धिविनायक न्यास मंडळाने अनाथ मुलांचा पालन खर्च उचलला आहे.
यानंतर आता महाराष्ट्रातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबातील मुलांचा केजी ते पीजी असा सर्व शैक्षणिक खर्च सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार असल्याचे न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी जाहीर केले आहे. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने त्यांनी ही घोषणा केली आहे.