मुंबई : मुंबईसह राज्यात उष्णतेची प्रचंड लाट पसरली असून हवामानात सुद्धा सातत्याने बदल होत असून सावधगिरीचा उपाय म्हणून राज्यातील ज्या शाळांच्या परीक्षा संपल्या असतील त्यांना आजपासूनच सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी शाळांनी गृहपाठही देऊ नये असे शालेय शिक्षण मंत्री, दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
अधिकृत परिपत्रक जारी करण्यात येईल : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मे महिन्याच्या सुट्टीच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील वाढते तापमान बघता ज्या शाळेत विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असतील त्या शाळांना आजपासूनच सुट्ट्या जाहीर करा, तसेच परीक्षांची इतर सर्व कामे आटोपली असतील तर शाळांना सुट्टी जाहीर करायला हरकत नाही, असे सांगत यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
सुट्टीही जास्त व गृहपाठही नाही : शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना अजून एक मोठी खुशखबरी दिली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास (गृहपाठ) देऊ नये असे सांगत, ही सुट्टी विद्यार्थ्यांना मौज - मस्ती करण्यासाठी असते. त्या सुट्टीचा त्यांनी आस्वाद घ्यायला हवा. शाळांनी या सुट्टीत १० वी चे विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांना अभ्यास देऊ नये, असेही केसरकरांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील शाळा १३ जून ऐवजी १५ जून रोजी सुरु होणार आहे. तसेच विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरु होणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांमुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना जास्तीची सुट्टी मिळणार तर आहेच, सोबत गृहपाठ ही नसल्याने विद्यार्थी आनंदात आहेत.
यंदा उष्णतेची लाट मोठी : राज्यात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, यंदा हा आगळा वेगळा उन्हाला आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा योग्य ती काळजी घ्यायला हवी. उन्हामध्ये खेळत असतांना सुद्धा योग्य त्या प्रमाणामध्ये खबरदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असेही केसरकर यांनी सांगितल आहे. उष्णतेची लाट यंदा मोठ्या प्रमाणामध्ये पसरली असल्याकारणाने संपूर्ण वातावरणात बदल मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहेत. अशा प्रसंगी विद्यार्थ्यांना मेंटल रिलॅक्सेशन सुद्धा अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी सुट्टीचाही आस्वाद घ्यावा, असेही दीपक केसरकर यांनी सांगितल आहे.