मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय व ईडीकडून तपास केला जात आहे. सुशांतसिंह राजपूत यांच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत ईडीकडून सुशांतच्या नोकर दीपेशने, नीरज या दोघांसह सुशांतच्या सुरक्षा रक्षकाला चौकशी समन्स बजाविण्यात आले आहे.
दरम्यान, ईडीकडून चौकशी केली जात असताना या चौकशीच्या अंतर्गत आत्तापर्यंत सुशांतसिंह राजपूतचा रुममेट सिद्धार्थ पीठाणी, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची चौकशी करण्यात आलेली आहे.
सुशांतसिंह राजपूत याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची ईडीकडून दोन वेळा 9 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आलेली आहे. या चौकशीदरम्यान सुशांतसिंह राजपूतच्या कुठल्याही पैशाचा वापर आपण स्वतःसाठी केला नसल्याचे रिया चक्रवर्तीने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुंबई व मुंबई बाहेर जी काही संपत्ती आपण विकत घेतलेली आहे, ती स्वतःच्या पैशाने विकत घेतल्याचे ही रिया चक्रवर्तीने ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
सुशांतसिंह राजपूत याच्या सोबत राहत असताना त्यांनी कुठल्या प्रकारची गुंतवणूक आत्महत्येपूर्वी केली होती, याचाही खुलासा रिया चक्रवर्तीकडे ईडी अधिकाऱ्यांनी मागितला होता. याबरोबरच रिया चक्रवर्तीने गेल्या पाच वर्षांतील आयकर भरणा केलेली कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केली आहेत.