मुंबई - दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी मुंबईच्या अंधेरी येथील तरुणाने कागदी लगद्यापासून इकोफ्रेंडली, पर्यावरणपूरक आणि कमी वजनाच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. अवघ्या 9 इंचापासून अडीच ते तीन फुटाच्या एक किलो ते अडीच किलो वजनाच्या ३०० पेक्षा अधिक गणेशमूर्ती त्याने तयार केल्या आहेत.
कागदी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकार रोहित वस्ते यांनी खास बंगळुरूरहून प्रशिक्षण घेतले आहे. मातीची मूर्ती तयार करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो तर कागदी गणेशमूर्ती तयार करण्यास २ दिवस लागतात. मूर्ती वाळविण्यासाठी ३ दिवसांचा कालावधी लागत असून त्यावर अंतिम हात देण्यासाठी २ दिवस लागतात.
या मूर्तींचे घरात पाण्यात विसर्जन केल्यानंतर मूर्तीसाठी वापरलेला कागद पुन्हा मिळतो. तो कागद सुकवल्यास तो पूर्वीसारखा होतो आणि त्याचे पूनर्वापर करता येते, असे रोहित वस्ते यांनी सांगितले.
कलेची जोपासना, उद्योगात वाढ आणि पर्यावरणाला जोपासण्याची काळजी यातून कागदी गणेशमूर्तीची संकल्पना पुढे आल्याचे वस्ते यांनी सांगितले.