मुंबई - प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडूच्या गणेशमूर्ती सर्वांना माहिती आहे. मात्र, मातीचा वापर करून दुधी, भोपळा, शेंगा यांच्यावर प्रक्रिया करून त्यापासून बनलेल्या इकोफ्रेंडली गणपती कलाकृतीचे प्रदर्शन दादरमध्ये निर्मिती कला आर्ट दालनात भरविण्यात आले आहे.
सध्या प्रदुषणापासून पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. हे लक्षात घेत 'निर्मिती आर्ट'च्या वतीने संपूर्णपणे आगळ्यावेगळ्या बनावटीचे पर्यावरणपूरक असे इकोफ्रेंडली गणपती देशभरातील कलाकारांकडून मागवण्यात आले आहेत. मन मोहून टाकणाऱ्या या प्रदर्शनात पेटी वाजविणारी गणेश मूर्ती, सनई वाद्य वाजविणारे गणेश तसेच कागदाच्या लगद्यापासून बनविलेली गणेशाची सुंदर आणि सुबक मूर्ती, कॅन्व्हासवर साकारलेला गणपती इत्यादी नाना तऱ्हेच्या क्लुप्त्या वापरून थक्क करायला लावणाऱ्या मनमोहक सुंदर अशा कलाकृती प्रदर्शनात पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनात दुधी भोपळ्यावर गणपतीचे आर्टवर्क केलेले डिझाईन लक्ष वेधून घेत आहे. बांबूच्या लॅम्पवरील गणेश, कमंडलू फळावरील डिझायनर गणेश आर्ट, फळांवर डिझाईन करण्यात आलेले अष्टविनायक लक्ष वेधून घेत आहे. गृहोपयोगी वस्तुंतून गणपतीची रूपे साकारली आहेत. स्केटिंग करताना, शेंगाना चाक लावून त्यावर विराजमान झालेले गणेश अशी अनेक रूपे कलेच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत.
टाकाऊ पासून टिकाऊ बनविण्यात आलेल्या अनेक प्रकारच्या आर्ट वर्क कला दालनात पाहायला मिळतात. नारळाच्या करवंटी सुकवून त्यापासून लॅम्प बनविण्यात आले आहेत, तर कडू लिबांच्या झाडाच्या फांद्या सुकवून त्यापासून उत्तम असे शो पीस साकारण्यात आले आहेत. हे प्रदर्शन 3 सप्टेंबर पर्यंत सकाळी 10 ते ८ यावेळेत खुले राहणार असल्याचे निर्मिती आर्ट्सचे सुरेंद्र खजांची यांनी सांगितले.