मुंबई - प्रसिद्धी मिळवण्यासाठी राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावले जातात. यापैकी बहुतांश बॅनर हे बेकायदेशीर लावलेले असतात. अशा बेकाययदेशीर १५ हजार बॅनरवर गेल्या आठ महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. तसेच १३९ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेदरम्यान राजकीय बॅनर रडारवर असणार आहेत. त्यावर त्वरित कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप
मुंबईत बॅनर लावण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. परवानगी न घेता बॅनर लावल्यास त्याला बेकायदेशीर समजून उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली जाते. बॅनरवर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकावर अनेकवेळा राजकीय दबाव आणला जातो. शाब्दिक बाचाबाची आणि मारहाणीसारखे प्रकारही यापुर्वी घडलेले आहेत.
हेही वाचा -'मन'से जाणून घेणार कार्यकर्त्यांचा कौल; मुंबईत जिल्ह्याध्यक्षांची बैठक
मुंबईमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधीत 15021 अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स आणि बॅनरवर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेच्या परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. कारवाई करण्यात आलेल्या बॅनरमध्ये 9051 राजकीय, 2288 व्यवसायिक तर 3682 धार्मिक बॅनरचा समावेश आहे. दरम्यान विविध पोलीस ठाण्यात 899 तक्रारी दाखल करण्यात आल्या असून 139 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आचारसंहितेदरम्यान राजकीय बॅनर रडारवर
नुकताच गणेशोत्सव पार पडला. यावेळी अनेक राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी केली. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेक ठिकाणी हे बॅनर तसेच आहेत. काहीच दिवसात नवरात्रोत्सव येऊ घातला आहे. यावेळीही शुभेच्छा देण्यासाठी बॅनरबाजी होणार आहे. हे सर्व बॅनर पालिकेच्या रडारवर असून आक्षेपाहार्य बॅनरवर कारवाई केली जाणार आहे.