मुंबई- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी, मोडकसागर तलाव शुक्रवारी सायंकाळी ओव्हरफ्लो झाला. गेल्या काही दिवसात तलाव क्षेत्रात पाऊस झाल्याने तलावांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सातही तलावांत सध्या ६४.१४ टक्के पाणीसाठा असून तो मुंबईकरांना २५४ दिवस पुरेल इतका आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावांमधील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईला सात तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील १५० दशलक्ष लिटर पाणी भिवंडी आणि ठाण्याला दिले जाते. मुंबईला ३१ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी सर्व तलाव मिळून १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या सातही तलावांत मिळून ९ लाख २८ हजार ३२६ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा मुंबईला पुढील २५४ दिवस पुरेल इतका आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव १२ जुलै रोजी तर तानसा तलाव २५ जुलैला भरून वाहू लागला होता. तर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सध्या सुरु असलेला पावसाचा जोर पाहता लवकरच उर्वरित तलावही भरून वाहू लागतील, असा अंदाज जलविभागाकडून व्यक्त केला जातो आहे.