मुंबई - मानखुर्द परिसरातील मोहिते पाटीलनगर, म्हाडा वसाहतीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण सापडले होते. आपल्या परिसरात नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच कोरोनाचा प्रभाव रोखू शकलो, अशी प्रतिक्रीया नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी दिली.
मुंबई आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सक्रे यांनी आपल्या वार्डात रक्तदान शिबिर आयोजित केले. या रक्तदान शिबिराला स्थानिक तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सक्रे यांनी 70 हून अधिक रक्ताच्या बाटल्या जवळच्या महानगरपालिका रुग्णालयाला दान केल्या.
मानखुर्द परिसरातील मोहिते पाटील नगर, म्हाडा कॉलनी, आंबेडकर नगर, साठेनगर, पीएमजीपी कॉलनी हे भाग गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे हॉटस्पॉट बनले होते. यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या महानगरपालिका प्रशासनाकडून सील करण्यात आल्या होत्या. यावेळी नगरसेविका सक्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दोन हजारांहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, आर्सेनिकम अल्बम गोळ्यांचे वाटप करून नागरिकांची मदत केली.
या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळले होते. परंतु नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आणि सहकार्यामुळे ही रुग्णसंख्या घटवण्यात यश आल्याचे सक्रे यांनी सांगितले. नागरिकांनी यापुढेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्स पाळावे, मास्क वापरावा असे आवाहन त्यांनी केले.