मुंबई - सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पहाटेपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. तसेच बेस्टचे बसचे मार्गही वळविण्यात आले आहेत.
मुंबईला झोडपून गायब झालेल्या पावसाचे आज पुन्हा आगमन झाले. पहाटे 6 ते 7 वाजेपर्यंत शहर विभागातील वरळी एफ साऊथ वॉर्ड येथे 38, वरळी फायर स्टेशन येथे 34, जी साऊथ वॉर्ड येथे 28, फोर्सबेरी रिझर्व्हवायर येथे 27, बी वॉर्ड येथे 26, आय रुग्णालय आणि एफ नॉर्थ वॉर्ड ऑफिस येथे 24, मेमन वाडा फायर स्टेशन येथे 22, मांडवी फायर स्टेशन येथे 21, नायर हॉस्पिटल येथे 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
हेही वाचा - कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सवात देखावे नाहीत..!
तसेच, पूर्व उनगरात एम ईस्ट वॉर्ड ऑफिस येथे 19, चेंबूर फायर स्टेशन येथे 15 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरातील चिंचोली फायर स्टेशन येथे 14, दिंडोशी आणि दहिसर कांदिवली येथे 12 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मुंबई शहर विभागात जास्त पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले. हिंदमाता, किंग सर्कल, शिवडी आदी भागात पाणी साचले. यामुळे पाण्यातुन वाट काढताना वाहनधारकांना मोठ्या अ़़डचणींचा सामना करावा लागत आहे. या मुसळधार पावसामुळे बेस्ट वाहतुकीवरही परिणाम झाला असून 40, 213, 368 या मार्गावरील बसेस हिंदमाता फ्लायओव्हर, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालाय येथून शिवडी या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना घरी आणि कामावर जाताना त्रास सहन करावा लागला आहे.