मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना विषाणूला घाबरू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही कोरोना विषाणूचा धसका राज्य सरकारच्या महावितरण कंपनी नंतर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी कामगार संघटनांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
चीनच्या वुहान प्रांतापासून कोरोना विषाणूचा जगभरात फैलाव झाला. या विषाणूजन्य आजारामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही या विषाणूचे 30 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून पालिका आणि राज्य सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोनाला घाबरू नका, असे आवाहन नागरिकांना केले. यावेळी सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.
हेही वाचा - जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर
एकीकडे राज्य सरकार आणि मुंबई महापालिका नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा मुकाबला करता यावा म्हणून मुंबई महापालिका सज्ज झाली असताना पालिका कर्मचाऱ्यांनी मात्र याचा धसका घेतल्याचे समोर आले आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या मुंबई महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटना तसेच दि म्युनिसिपल युनियन या कामगार संघटनांनी पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र दिले आहे. या पत्राद्वारे बायोमेट्रिक हजेरीमुळे कोरोना पसरू शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून आणि खबरजारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पालिका आयुक्तांकडून अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे समजते.
हेही वाचा - मंत्रालयात पुष्प आणि मुख्यमंत्र्यांचे शुभेच्छा पत्र देऊन महिलांचे स्वागत
महावितरणमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद -
राज्य सरकारच्या महावितरण कंपनीने परिपत्रक काढून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणू संसर्गजन्य असून आरोग्यविषयक बाब असल्याने कोरोनाचा प्रसार महावितरणच्या कार्यालयामध्ये होऊ नये म्हणून कंपनीच्या सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.