मुंबई - कोरोनाचे अभूतपूर्व संकट लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. असे असतानाच मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाने अकरावील तब्बल ६० विद्यार्थ्यांना नापास केले आहे. नापास करण्यात आलेले सर्व विद्यार्थी हे विज्ञान शाखेतील आहेत.
माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. रुपारेल महाविद्यालयांने नुकतेच अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला असून त्यासाठीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना कळवली आहे. त्यात तब्बल ६० विद्यार्थ्यांना नापास केल्याचे समोर आले आहे.
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठीची प्रक्रिया दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू असते. त्याच दरम्यान अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या चाचण्या आणि अभ्यासक्रमही सुरू केला जातो. रूपारेल महाविद्यालयात प्रथम सत्राच्या परीक्षा आणि दोन चाचणी (युनीट) परीक्षाही पूर्ण झाल्या आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या सत्राची म्हणजेच अंतिम वर्षाची परीक्षा होऊ शकली नाही. अशातच रुपारेल महाविद्यालयाने ६० विद्यार्थ्याना नापास केले असल्याने पालकांमध्ये या विषयी संताप व्यक्त केला जात आहे.
रूपारेल महाविद्यालयात नापास केलेल्या विद्यार्थ्यांची अकरावीत प्रवेश झाल्यानंतर ४० दिवसांच्या आत प्रथम सत्राची परीक्षाही घेण्यात आली. त्यामुळे त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी वेळ न मिळाल्याने त्यांना कमी गुण मिळाले असावेत. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र अकरावीच्या परीक्षेत अंतिम वर्षाच्या परीक्षेचे सरासरी गुणही लक्षात घेऊन त्यांचा निकाल दिला जातो, अशाच केवळ प्रथम सत्रातील गुण गृहीत धरून आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीचा कोणताही विचार न करता आम्हाला नापास करणे, चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी, या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज्य शिक्षक परिषदेकडेही धाव घेत, यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
हेही वाचा - पेट्रोल, डिझेलचे दर कमी होईनात, २०व्या दिवशीही दरवाढ कायम
हेही वाचा - कृषी विद्यार्थ्यांना अखेर दिलासा; राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत