मुंबई - सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पुढे आलेला ड्रग्जचा अँगलदेखील तपासला जात आहे. या तपासाची जबाबदारी आयआरएस म्हणजेच इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस खात्यातील एका मराठी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. या मराठी अधिकाऱ्याचे नाव समीर वानखेडे आहे. समीर हे मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सध्या तीन केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत. यातील एक असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) युनिट समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रं हातात आल्यानंतर त्यांनी वेगाने तपास पुढे नेला. या प्रकरणात दोन ड्रग्ज पेडलर्स आणि रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना त्यांनी अटक करून आज (शनिवारी) न्यायालयासमोर हजर केले. त्यांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह प्रकरण : शोविक चक्रवर्तीला अमली पदार्थ पुरवणाऱ्या कैजाण इब्राहिमची जामिनावर सुटका
2008 साली आयआरएसची परीक्षा पास झाल्यानंतर समीर यांची पहिली नियुक्ती मुंबई विमानतळावर झाली होती. इथे काम करताना त्यांनी अनेक सेलिब्रिटींना परदेशी वस्तू आणताना जेरबंद केले होते. कस्टम ड्युटी भरल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले. मिका सिंग यांनी आणलेले परदेशी चलन असो किंवा क्रिकेट वर्ल्डकप दरम्यान कस्टम ड्युटी भरल्याशिवाय भारतात आणलेली सोन्याची ट्रॉफीही थांबवून ठेवण्याचे धाडस वानखेडे यांनी केले होते. अनुराग कश्यप, राम गोपाल वर्मा यांच्या घरांवर छापे टाकण्यात देखील त्यांनीच पुढाकार घेतला होता.
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी बांधली लग्नगाठ -
भारतीय महसूल सेवेतील अधिकारी समीर वानखेडे यांनी 2017 साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला होता. अत्यंत गुप्तपणे केलेल्या या विवाहाला फक्त मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांना जुळी मुले आहेत. समीर यांच्याकडे सुशांत प्रकरणाचा तपास आल्यामुळे आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.