मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंकवर 'हिट अँड रन'चा धक्कादायक प्रकार घडला असून यात एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला असून पोलीस उपनिरीक्षक थोडक्यात बचावला आहे. शनिवारी रात्री ऑडी गाडीने दिलेल्या धडकेत वांद्रे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार बंकट नवगिरे गंभीर जखमी झाले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग पोकळे थोडक्यात बचावले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच वांद्रे पोलिसांचे पथक नांदेड येथे ऑडी कारमालकाच्या शोधात रवाना झाले असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न: वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री वरळी सी लिंकवर अपघात झाल्याचा फोन वांद्रे पोलिसांना प्राप्त झाला होता. प्राप्त कॉलनुसार, पोकळे आणि नवगिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर नवगिरे आणि पोकळे हे घटनास्थळी पंचनामा करत होते. पंचनामा करत असताना अचानक भरधाव वेगाने एक ऑडी कार नागमोडी वळण घेत पोकळेंच्या दिशेने आली. तेव्हा त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी टोल प्लाजाच्या दिशेने धाव घेतली. तसेच नवगिरे हेरस्त्याच्या बाजूने धावले. तरीदेखील कार उजव्या दिशेने येत असल्याने नवगिरे यांना कारची जोरदार धडक बसली. ज्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पोलिस पथक नांदेडला रवाना: ऑडी कारचालक अपघातानंतर पसार झाला असून त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर पोलीस कॉन्स्टेबल बँकेत नवगिरे आणि पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पोकळे यांना ताबडतोब वांद्रे येथील असलेल्या भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयात नवगिरे यांच्या डाव्या हाताचे हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरने सांगितले. उपचारानंतर नवगिरे यांना घरी सोडण्यात आले. ही संपूर्ण घटना सी लिंकवरील टोल प्लाझा कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ऑडीचालकाचा शोध सुरु आहे. त्याच्या शोधात वांद्रे पोलिसांचे पथक नांदेड येथे रवाना झाले आहे. ऑडी कार सेकंडहॅन्ड विकत घेतलेली असून त्याचा मालक नांदेड येथे राहत असल्याची माहिती मिळत आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर अपघाताची मालिका सुरूच: अलीकडेच वांद्रे-वरळी सी लिंकवर गंभीर अपघात झाला होता. या अपघतात १० जण जखमी झाले होते. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे.वांद्र-वरळी सी लिंकवर पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. सी लिंकवर चार कार आणि एक रुग्णवाहिका एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला होता.