मुंबई : मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये जलप्रलय आला होता. त्याचप्रमाणे दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. पावसाचे पाणी शहरात साचू नये म्हणून नालेसफाई केली जाते. यंदाच्या पावसाळ्यासाठी पालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामासाठी २२६ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. छोटे नाले, मोठे नाले, रस्त्याच्या कडेची पावसाळी गटारे व मिठी नदी मधील गाळ काढण्याच्या कामांसाठी यावेळी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
इतका काढला जाणार गाळ : मोठ्या नाल्यासाठी ९० कोटी, छोट्या नाल्यांसाठी ९० कोटी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मोठ्या नाल्यातून सुमारे ४ लाख ६३ हजार मेट्रिक टन तसेच छोटे नाले व पावसाळी गटारे यातून ४ लाख २४ हजार मेट्रिक टन एवढा गाळ काढला जातो. एकूण साडेदहा लाख मेट्रिक टन गाळ काढून मुंबई बाहेरील क्षेपणभूमीवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी साडेसात लाख मेट्रीक टन गाळ पावसाळ्यापूर्वी मे अखेरीपर्यंत काढण्यात येणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
इतका गाळ काढल्याचा दावा : मुंबईतील नाले आणि मिठी नदीमधील गाळ काढण्याची कामे मार्च २०२३ पासून सुरु झाली आहेत. आतापर्यंत शहर विभागात ४६.३२ टक्के, पूर्व उपनगरात ५६.४९ टक्के, पश्चिम उपनगरात ४४.६१ टक्के तर द्रुतगती महामार्गावर १९.२१ टक्के नालेसफाई झाली आहे. मिठी नदीमधून २६.७० टक्के गाळ काढण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ३ लाख ५४ हजार ३०४.५८ मेट्रिक टन म्हणजेच ३६.८० टक्के गाळ काढण्यात आला आहे.
३१ मे पूर्वी गाळ काढा : पावसाळापूर्व नाल्यातून गाळ काढण्याची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. नालेसफाईची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ तसेच यंत्रसामुग्री वापरावी असेही आदेश देण्यात आले आहेत. प्रतिवर्षी नालेसफाई करण्यात येते. त्यात गाळ काढण्याची आकडेवारी आणि वस्तुस्थिती यात तफावत असते. प्रत्यक्षात नालेसफाई झालेली आकडेवारी पालिकेने द्यावी. तसेच मुंबईची तुंबई होणार नाही याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये कुठेही नालेसफाई होताना दिसत नाही. पालिकेने दावा केला असला तरी प्रत्यक्षात १० ते १२ टक्केच नालेसफाई झाली आहे. नालेसफाई होते कि नाही याची सरप्राईझ भेट देऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी अशी मागणी, पालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.