मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत चालला असून ही चिंतेची बाब आहे. शासनाकडून जे नियम लागू करण्यात आले आहेत, त्याचे काटेकोर पालन केले जाण्याची गरज असल्याचे मत कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले डॉ. तात्याराव लहाने -
कोणताही विषाणू त्याच्या स्वरुपात बदल करत असतो, त्याप्रमाणे कोरोना विषाणूच्या स्वरुपात सध्या बदल झालेला आहे. मात्र, त्याच्या स्वरुपात नेमका किती बदल झालेला आहे यावर संशोधन करण्याची गरज असून ते केले जाईल. मात्र, बदललेल्या स्वरुपामुळे नक्कीच एकाला लागण झाल्यानंतर सर्व कुटुंबाला लागण होत आहे. त्यामुळे घरात बाधित रुग्णाचे अलगीकरण करणे गरजेचे आहे.
संसर्गाचे प्रमाण वाढले
मागच्या काळात एका माणसापासून तीन ते चार जणांना संसर्ग व्हायचा, मात्र आता एका माणसापासून दहापेक्षा अधिक लोकांना संसर्ग होत आहे. त्यामुळे पूर्ण कुटुंब बाधित झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. मागल्यावेळी ५० वर्षांवरील लोकांना जास्त संसर्ग होत होता, मात्र यावेळी २० वर्षांपर्यंत हे प्रमाण खाली आले आहे. तरुणांमध्ये किंवा नोकरी धंद्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांना बाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांच्यामध्ये बाधित होण्याचे प्रमाण फार वाढले नसून त्यामध्ये एक ते दोन टक्क्याचा फरक आहे.
सर्वांनी कोरोना नियम पाळल्यास आकडा खाली येईल
सध्या ८० टक्के संसर्ग झालेल्या लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्यांना बाधा झाली आहे, पण कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की, बाहेर पडून आपल्यामुळे इतरांना होणार संसर्ग रोखला पाहिजे. घरातही आपण कोणाच्या संपर्कात न येता वेगळे राहण्याची गरज आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला बाधा होणार नाही. आपल्याकडील सध्याची आरोग्य व्यवस्था चांगली आहे. सध्या रुग्णालयांमध्ये ३ लाख ६० हजारहून अधिक खाट आहेत. १ लाख ५० हजार रुग्णालये आहेत, अतिदक्षता विभागही १९ हजारापेक्षा जास्त आहेत. आपल्याकडे खाटांची समस्या नाही. काही शहरांमध्ये अचानक खूप रुग्ण वाढल्याने ९० टक्केच्या वर खाट भरले आहेत. तेथे सर्वांनी कोरोना नियम पाळल्यास ही संख्या नक्की खाली येईल. कोरोनाची त्रिसुत्री पाळायला हवी, ती म्हणजे हात स्वच्छ ठेवणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे. मास्क घातला तरी तो नाकाच्या खाली येता कामा नये. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे सूत्र महत्त्वाचे आहे.
कोरोना तुमच्याकडे कायमचा राहणार नाही, नियम पाळा आणि त्याला पळवून लावा
सध्या कोरोना वाढण्याला लोकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, असे आपल्याला म्हणता येणार नाही. गेल्या वर्षभरापासून लोक नियम पाळत आहेत, मास्क घालत आहेत मात्र आता त्यांना याचा कंटाळा आला आहे. पण, सगळ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, कोरोना आपल्याकडे कायमचा घर करून राहायला आलेला नाही, नियम पाळून आपण त्याला पळवून लावू. काही गोष्टी आपली इच्छा नसतानाही कराव्या लागतात, असे समजून सर्वांनी मास्क वापरले पाहिजेत. असे केले तरच आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबाचे आणि राज्याचे संरक्षण होणार आहे.
लहान मुले, तरुणांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव
वैद्यकीय विभागाच्या आकड्यानुसार मार्च महिन्यात राज्यभरात 6 लाख बाधितांमध्ये मुले व तरुणांचे प्रमाण जास्त होते. बाधितांमध्ये 21 ते 30 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 17 टक्के, 31 ते 40 वयोगटातील रुग्णांचे प्रमाण 22 टक्के तर 41 ते 50 वयोगट 18 टक्के होते. या वर्षी 0-10 वयोगटात जानेवारी मध्ये 2000, फेब्रुवारी मध्ये 2700 आणि मार्चेमध्ये 15,500 अशी रुग्णसंख्येत वाढ होत गेली. 10-20 वयोगटात हे प्रमाण जानेवारी-5300, फेब्रुवारी 8000 आणि मार्च 40,000 असे होते. गेल्या वर्षी 0-10 वयोगटातील 87,000 तर 10-20 गटातील 1.82 लाख मुलांना करोनाचा फटका बसला.
मात्र, लहान मुले आणि तरुणांमध्ये कोरोना वाढत असला तरी त्याबद्दल घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. बदलत्या विषाणूमुळे संक्रमण तरुणांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये होत आहे. शासनाने आरोग्य व्यवस्था तयार करून ठेवली आहे. त्यामुळे सध्या तरी टाळेबंदी करायची गरज नाही. मात्र, नियम कडक करण्याची गरज असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.